पणजी : विशेष दर्जाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गोवा विधानसभेचे शिष्टमंडळ सप्टेंबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही माहिती मंगळवारी विधानसभेत दिली. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या मंगळवारी पहिल्या दिवसाच्या कामकाजात आमदार रोहन खंवटे यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. विशेष दर्जाच्या मागणीविषयी गोवा आग्रही असून गोव्याला त्याची किती गरज आहे, याविषयी केंद्रीय नेत्यांना समजविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आपल्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. गोवा मागत असलेला विशेष दर्जा हा कशा स्वरूपाचा आहे, याबद्दल त्यांना माहिती हवी आहे. विशेष दर्जाची मागणी गोवा व बिहारसह अनेक राज्यांनी केली आहे; परंतु विविध राज्यांना अपेक्षित असलेला विशेष दर्जा हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे गोवा विधानसभेचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांना चतुर्थीनंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात भेटणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी विशेष दर्जाची मागणी केंद्र सरकारकडून घटनेशी विसंगत असल्याचे सांगण्यात आले होते, याची आठवण दिगंबर कामत यांनी करून दिली. त्यामुळे या वेळी काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)
विशेष दर्जावरील चर्चेसाठी केंद्राचे निमंत्रण
By admin | Updated: July 23, 2014 00:48 IST