पणजी : सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सादर केलेल्या एका तक्रारीच्या अनुषंगाने सीबीआय कोर्टाने गोवा सरकारच्या दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला (एसीबी) कडक शब्दांत सुनावले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरुद्ध रॉड्रिग्ज यांनी एका नोकर भरती प्रकरणी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांविरुद्ध एफआयआर नोंद केला जावा म्हणून रॉड्रिग्ज हे न्यायालयात गेले होते. न्यायालयाने एफआयआर नोंद करण्याचा आदेश दिला नाही; पण एसीबीला कडक शब्दांत योग्य तो सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्ध असलेल्या तक्रारीबाबत एसीबीने मुख्यमंत्र्यांकडूनच आदेश घेतले. असा प्रकार म्हणजे आरोपीकडूनच आदेश घेण्यासारखे आहे, असे सीबीआय कोर्टाने म्हटले आहे. मंत्र्यांविरुद्ध असलेल्या तक्रारीवर त्याच मंत्र्यांकडून आदेश घेणे, अशा प्रकारची प्रक्रिया करू नका, असे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी एसीबीच्या पोलीस अधीक्षकांना सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा संदर्भही सीबीआय कोर्टाने घेतला आहे. दरम्यान, नोकर भरतीवेळी फसवणूक झाल्याचा व शासकीय तिजोरीला नुकसान झाल्याचे अॅड. रॉड्रिग्ज यांचे म्हणणे होते. तथापि, सीबीआय न्यायालयाने एफआयआर नोंद करण्याचा आदेश दिलेला नसल्याने रॉड्रिग्ज यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. (खास प्रतिनिधी)
सीबीआय कोर्टाने एसीबीला सुनावले
By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST