पणजी : येत्या रविवारनंतर पावसाचा मोसम संपेपर्यंत कावरे येथे खनिजाची वाहतूक केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी कावरेतील ग्रामस्थांना दिली. कावरेवासियांच्या रोजगारासह तेथील ट्रक व्यावसायिकांच्या ज्या समस्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी देऊन येत्या २९ रोजी केपे येथे बैठक घेणे निश्चित केले आहे. कावरेचे पंच रवींद्र वेळीप यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. कावरे येथील नागरिकांनी शुक्रवारी पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना कावरेत खनिज व्यावसायिकाने चालविलेल्या गोंधळाबाबतचे पुरावे सादर केले, असे वेळीप यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कावरेतील लोकांसोबत खाण अधिकार्यांनी कावरे येथील खनिज मालाची व डंपची पाहणी केली. खनिज मालाबाबतची इन्व्हेंटरी नीट ठेवली गेलेली नाही, हे त्या वेळी स्पष्ट झाले. संबंधित खनिज व्यावसायिक कायदेशीर खनिज मालासोबत अन्यत्र ठेवलेला अन्य मालही आरामात नेऊ शकतो, हे तेथील पाहणी केल्यानंतर अधिक स्पष्ट झाल्याचे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याची व योग्य ती उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकार्यांबाबतही आम्ही केलेल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पटल्या, असे वेळीप यांचे म्हणणे आहे. येत्या २९ रोजी मुख्यमंत्र्यांनी केपे येथे बोलविलेल्या बैठकीवेळी आम्ही अधिक माहिती देऊ, असे वेळीप म्हणाले. कावरे येथील खनिज मालाचे प्रमाण व दर्जा न तपासताच वाहतूक सुरू करण्यात आली. आम्ही उठविलेल्या आवाजामुळे आणि दाखवून दिलेल्या त्रुटींमुळे सरकारचाच महसूल वाचला आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी न घेतली गेल्याने यापुढे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होण्याची व प्रदूषणही होण्याची समस्या आहे. कावरेशी संबंधित खाण व्यावसायिकाने बनावट डेटा सादर केला आहे, त्यावरही कावरेतील लोकांनी बोट ठेवले. जो खनिज माल टीसी क्रमांक ५९-५१ मध्ये आहे, तो माल टीसी क्रमांक १०-५१ मधील असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न खाण व्यावसायिकाने कशा प्रकारे केला ते दाखवून देणारी छायाचित्रे आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर केली, असे वेळीप यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
कावरेची वाहतूक रविवारनंतर बंद !
By admin | Updated: May 24, 2014 00:26 IST