लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याचा काजू हा चव, रंग आणि गुणवत्तेने खास असतो. पण काही विक्रेते गोव्याचा काजू सांगून बाहेरील काजू विकतात. पण गोमंतकीय काजू इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे यावर्षी गोव्याच्या काजूला 'जीआय टॅग' मिळेल. त्यातून या काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होईल, असे मत वन विकास मंडळाच्या अध्यक्ष, आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
पणजीत एका कार्यक्रमावेळी बोलताना आमदार राणे म्हणाल्या की, राज्यातील स्थानिक काजू शेतकरी आणि उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी नकली काजू विक्रेत्यांवर आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनालय (एफडीआय) मार्फत अनेक ठिकाणी छापासत्र सुरू आहे. यापुढेही या संदर्भातील जनजागृतीमध्ये काजू फेस्टिव्हल महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
आमदार राणे म्हणाल्या, नकली काजू विक्रीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे आणि उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांचे संरक्षण आणि स्थानिक काजूची खरी ओळख जपण्यासाठी जीआय टॅगचा प्रसार व्हायला हवा.