मांद्रे : केरी-तेरेखोल खाडीतून बेदरकारपणे कोळसा वाहतूक करणाऱ्या व्हाईड ओर्चेड बार्ज वाहतूक कंपनीने गोवा बंदर आणि कप्तान खात्याकडे कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार न करता व सरकारलाही न जुमानता कोळसा वाहतूक चालू ठेवल्याची आरटीआयद्वारे माहिती मिळाल्याचे केरी-तेरेखोल-पालये ग्राम बचाव समितीचे निमंत्रक सचिन परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केरी-तेरेखोल-पालये ग्राम बचाव समितीने केरी फेरी धक्का परिसरात शनिवार १४ मार्च रोजी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेला समितीचे निमंत्रक परब यांच्यासमवेत समितीचे सल्लागार अॅड. प्रसाद शहापूरकर, तेरेखोलचे फा. ज्योविनो, शशिकांत पेडणेकर, मिलिंद तळकर, आगुस्तीन डिसोझा, उल्हास पेडणेकर, रोहिदास पेडणेकर व समितीचे इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. परब म्हणाले, की ३ मार्च २०१५ रोजी बंदर व कप्तान खात्याकडे माहिती हक्क कायद्याद्वारे अर्ज सादर करून व्हाईड ओर्चेड कंपनीने परवान्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत व कोळसा वाहतुकीसंदर्भातील तपशील देण्याची मागणी केली होती. बंदर कप्तान खात्याकडून ‘कोरा’ अहवाल देण्यात आला. संबंधित कंपनीने कोणत्याच प्रकारचा पत्रव्यवहार केला नसल्याने कंपनीला कोळसा वाहतूक परवाना देण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचे त्यातून स्पष्ट होत असल्याचे परब यांनी नमूद केले. यापुढे संबंधित व्हाईड ओर्चेड कंपनीने संबंधित खात्याकडे परवाना मागण्यासाठी अर्ज केल्यास तो रद्दबातल ठरवून परवाना देऊ नये, अशी मागणी परब यांनी केली. २२ मार्च रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून लोकजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीकडून ७ फेब्रुवारी रोजी पेडणे पोलीस निरीक्षकाकडे बेकायदेशीर कोळसा बार्ज वाहतुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षकांनी लागलीच ९ फेब्रुवारी रोजी बंदर कप्तान खात्याकडे पत्रव्यवहार चालू केला. मात्र, संबंधित खात्याकडून एका महिन्याच्या अंतराने त्याची दखल घेऊन संंबंधित कंपनीकडून कोणताच कायदेशीर मार्ग अवलंबिला गेला नसल्याचे स्पष्ट करणारा अहवाल दिल्याचे परब म्हणाले. अॅड. प्रसाद शहापूरकर, फा. ज्योवीनो यांनीही या वेळी मत मांडले. (प्रतिनिधी)
केरी-तेरेखोलमधील कोळसा वाहतूक बेकायदाच
By admin | Updated: March 15, 2015 02:58 IST