पणजी : विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र आमदार विश्वजित राणे यांच्या विरोधात नोंद झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तापास चालू असतानाच भालचंद्र नाईक यांच्या दहेज मिनरल्स कंपनीचे गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हे प्रकरण त्यांच्यावरच बुमरँग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडून कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स पाठवून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचे संचालक उदय महात्मे यांची उद्या सोमवारी एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट आर. पिकले यांनाही एसआयटीकडून समन्स बजावले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या सर्व लहान आणि मोठ्या अधिकाऱ्यांनाही एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर कंपनीला सर्व कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. राणे पिता-पुत्रांनी खाण चालविण्यासाठी दहेज मिनरल्स कंपनीकडून खंडणी घेतल्याचे आरोप केल्यामुळे एसआयटीकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा नाईक यांच्या कंपनीचेच गैरप्रकार उघड होऊ लागले. उत्खननाचा परवाना मिळविण्यापूर्वीच दहेज मिनरल्स या खाण कंपनीकडून पर्ये येथे ८७.५२ चौरस मीटर जमिनीत ६० हजार टन खनिज उत्खनन केल्याची माहिती खाण खात्यातील नोंदीतून उघड झाली आहे. कंपनीला दिलेल्या उत्खननाच्या परवान्याची मुदत संपल्यानंतरही खनिजाचे उत्खनन चालू ठेवले होते. त्यामुळे खाण व खनिज कायद्याचे उल्लंघन केल्याचाही ठपका कंपनीवर ठेवला होता. आता नाईक यांचा आरोप त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
दहेज मिनरल्सवर बुमरँग शक्य
By admin | Updated: July 14, 2014 02:08 IST