लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला असून येत्या ३१ पर्यंत सर्व बूथ समित्या निवडल्या जातील. त्यानंतर मंडल समित्या, जिल्हा कार्यकारिणी व डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या प्रारंभी नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल.
जाईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली. बूथ समित्या निवडणूक प्रक्रियेसाठी काल बैठक झाली. निर्वाचन अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मंडल, जिल्हा व राज्य कार्यकारिणी निर्वाचन अधिकाऱ्यांचीही अशीच बैठक घेण्यात येईल.
तानावडे म्हणाले की, येत्या २९ रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा होईल. पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेखा वर्मा तसेच गोवा प्रभारी आशीश सूद उपस्थित राहणार आहेत. ४ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केले आहे. दरम्यान, लोकमतला प्राप्त माहितीनुसार या पदासाठी माजी आमदार दयानंद सोपटे, दिलीप परुळेकर, दामू नाईक आदींची नावे चर्चेत आहेत.
तानावडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपून त्यांना लोकसभा निवडणुकीनिमित्त मुदतवाढ दिली होती. आता महाराष्ट्राच्या निवडणुकाही पार पडलेल्या आहेत.