पणजी : येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-मगो युतीतील संबंध ताणले गेले आहेत. युती तोडावी, असा मगोचा हेतू असून केवळ जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव देण्याचे नाटक केले जात आहे, अशी टीका भाजपचे आमदार सुभाष फळदेसाई, नीलेश काब्राल व इतरांनी मंगळवारी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या आमदारांनी युतीविषयी आता आक्रमक भूमिका घेतली असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. फळदेसाई, काब्राल, माजी आमदार दामू नाईक व विल्फ्रेड मिस्किता यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घ्याव्यात, हा सरकारचा निर्णय आहे. भाजपने मगोसोबत फक्त विधानसभा निवडणुकीपुरती युती केली होती. जिल्हा पंचायत निवडणुकीविषयी त्या वेळी काहीच बोलणी झाली नव्हती. मगोचे नेते आधी पत्रकार परिषदा घेतात आणि युतीचा प्रस्ताव आपण भाजपला पाठवला असल्याचे सांगतात. पत्रकार परिषद झाल्यानंतर मग भाजपच्या कार्यालयात मगोकडून एक पत्र पाठविले जाते. फक्त सोपस्कार पार पाडला जातो. मगोच्या नेत्यांना जर खरोखर जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी युती झालेली हवी असेल, तर त्या पक्षाच्या नेत्यांनी चर्चेसाठी यावे. घटस्फोटाच्या नोटिसा दिल्याप्रमाणे पत्रे पाठवू नयेत, असे आमदार फळदेसाई म्हणाले. फळदेसाई म्हणाले की, युती तोडावी असे आमच्या मनात नाही. मगो पक्षाच्या नेत्यांच्या मनात तसे आहे. पत्रे वगैरे पाठवून कधी युती होत नसते. त्यासाठी नेत्यांनी चर्चेसाठी यावे लागते. मगोने आतापर्यंत निश्चित अशा स्वरूपाचा प्रस्ताव दिलेला नाही. यापूर्वी विधानसभेवेळी जेव्हा युती झाली होती, तेव्हा मगो पक्षाने अशी पत्रे पाठवली नव्हती. आमची दारे चर्चेसाठी अजून खुली आहेत. मगोने युतीचा धर्म पाळावा. भाजप हा आपला पालक पक्ष आहे, हे मगोने लक्षात घ्यावे. मगो पक्ष आता स्वबळावर लढू शकतो, असे त्या पक्षाला वाटत असेल, तर तसेही करून पाहावे. (खास प्रतिनिधी)
भाजप-मगोत तणाव
By admin | Updated: February 18, 2015 01:59 IST