लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी कदंब पठारावर जुने गोवे बगल रस्त्यानजीक चालू असलेल्या भाजपच्या भव्य इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. येत्या डिसेंबरपर्यंत ही इमारत पूर्ण होईल व नवीन वर्षात कार्यालयाचे येथे स्थलांतर केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खजिनदार संजीव देसाई, माजी आमदार तथा पक्षाच्या आयटी विभागाचे निमंत्रक सिद्धार्थ कुंकळ्येंकर उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल. कदंब पठारावर २९०० चौरस मीटर जागेत भाजपच्या भव्य कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम चालू आहे. ६०० आसन क्षमतेचा हॉल व इतर व्यवस्था इमारतीत असणार आहे.
प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासाठी स्वतंत्र दालने, मोठा कॉन्फरन्स हॉल, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी सभागृह, व्हर्चुअल मीटिंग करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा या नवीन भाजप भवनमध्ये असेल. केंद्रातून येणाऱ्या नेत्यांची निवास व्यवस्था, अशी सज्जता येथे असणार आहे. तळमजला अधिक दोन मजले, अशी रचना ठरलेली आहे.
दोन स्लॅबचे काम पूर्ण
फोंडा येथील आर. बी. एस. खांडेपारकर कंपनी बांधकाम कंत्राटदार आहे. इमारतीच्या दोन स्लॅबचे काम पूर्ण झालेले आहे. अंदाजित खर्चाच्या २५ टक्के काम झालेले आहे. आणखी दोन स्लॅब व स्ट्रक्चरल छताचे काम बाकी आहे. मार्च २०२६ पर्यंत सुसज्ज इमारतीचा ताबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.