लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर हे दूरदृष्टीचे नेते होते, म्हणूनच ग्रामीण भागातील मुले आज उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांनी शिक्षण सुविधा निर्माण केल्या म्हणूनच आज माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार बनू शकली', असे मत आमदार गोविंदा गावडे यांनी मांडले. फर्मागुडी येथील भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याजवळ आदरांजली व्यक्त केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार गणेश गावकर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, 'भाऊसाहेबांची आठवण केवळ दोन दिवसांपूर्वी सीमित न ठेवता त्यांचे कार्यकर्तृत्व नेहमी आठवणीत ठेवण्यासारखे माध्यम तयार व्हायला हवे. बहुजन समाजामधील युवकांनी त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करावा.'
आमदार गणेश गावकर म्हणाले की, 'लोकप्रतिनिधी कसा असावा याचे काही नियम भाऊसाहेब बांदोडकर यांनी घालून दिले आहेत. लोकप्रतिनिधींनी स्वतःला नव्हे तर लोकांना हवे त्या प्रमाणात काम करायला हवे. ज्या लोकप्रतिनिधींची कामे जनतेला आवडतात तोच खरा लोकप्रतिनिधी.