लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये उत्साह दाखवलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आगामी पालिका, झेडपी, पंचायत व विधानसभा निवडणुकीतही जोमाने कार्य करून भाजपला पुन्हा यश मिळवून द्यावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
भाजपच्या नावेली मंडळातर्फे रुमडामळ येथील पटीदार सभागृहात आयोजित समारंभात प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल नाईक यांचा आणि दक्षिण गोवा भाजप अध्यक्षपदी निवडीबद्दल प्रभाकर गावकर यांचा आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नाईक बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. भाजप हा अंत्योदय तत्त्वावर चालणारा तळागाळातील जनतेचा पक्ष आहे. विकास व लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसापर्यंत पोहोचवणे हे भाजपचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व नेते निःस्वार्थीपणे केवळ जनतेचे भले व्हावे, हाच ध्यास घेऊन झपाटून कार्य करत आहे. त्याला आपण पाठबळ देण्याची गरज आहे.
आमदार उल्हास नाईक-तुयेकर म्हणाले की, 'नाईक हे तळागाळातून पुढे आलेले नेते आहेत. कष्ट, संघर्ष करून यश मिळवल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व उजळून निघाले आहे. यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जपला सर्व स्तरांवर यश मिळवून दिले. तसेच पक्ष आणखी पुढे नेण्याची नाईक यांच्यात क्षमता आहे.
भाजपच्या नावेली मंडळाचे अध्यक्ष विजय सुरमे, सरचिटणीस दीपक सावंत व प्रमोद प्रभू, जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, दिकरपाल दवर्लीचे सरपंच साईश राजाध्यक्ष, आके बायशचे सरपंच डॅनी फर्नांडिस, दिकरपाल दवर्लीचे उपसरंपच विद्याधर आर्लेकर, अविनाश सरदेसाई, रामदास उसगावकर, मिलिंद साळुंखे, संपदा नाईक, संतोष नाईक, दामू चव्हाण, मधुकला शिरोडकर, सुशांत नाईक, दिनेश महाले उपस्थित होते. कपिल सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.