म्हापसा : देशातील इतर राज्यांप्रमाणे राज्य सरकारनेही नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवर गोव्यात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी सोमवार, ८ जूनपासून लागू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. इतर राज्यांत मॅगीचे नमुने सदोष असल्याचे स्पष्ट झाले. ते आरोग्यासाठी अपायकारक असल्याने बंदी घालण्यात आली. त्यामुळे कोणाताही धोका न पत्करण्याच्या हेतूने, लोकांच्या सुरक्षेसाठी मॅगीवर बंदी घालणाचे सरकारने ठरवल्याचे ते म्हणाले. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील बाजारांतून मॅगीचे पाच नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले होते. यात गोव्यात तयार झालेल्या चार तर इतर राज्यातून आलेल्या एका नमुन्याचा समावेश आहे. त्यांची तपासणी प्रशासनाच्या प्रयोगशाळेत केली होती. त्या वेळी त्यात आरोग्यासाठी अपायकारक असे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे संबंधित नमुने म्हैसूर (कर्नाटक) येथील एका खासगी संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तिथून अहवाल आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल. गोव्यात तयार झालेल्या मॅगीबरोबर इतर राज्यांत तयार झालेल्या मॅगीची विक्रीही गोव्यात करण्यात येते. इतर कंपनीने तयार करून पॅक केलेल्या उत्पादनाची तपासणी केली जाणार का, असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, सरकार कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे इतर कंपनीच्या उत्पादनाच्या तपासणीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. संबंधित कंपनीचा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही पार्सेकर यांनी दिली. (खास प्रतिनिधी)
गोव्यातही मॅगीवर बंदी
By admin | Updated: June 8, 2015 00:46 IST