पणजी : सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना पक्षातून काढून टाकण्यात यावे आणि कोणत्याही परिस्थितीत भविष्यात त्यांना पुनर्प्रवेश देऊ नये, असा ठराव काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला. या ठरावाची कार्यवाही ८ दिवसांत होणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पणजी पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मोन्सेरात यांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात यावे आणि पुन्हा कधीही त्यांना पक्षात घेऊ नये, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी दिली. मोन्सेरात यांनी २२ डिसेंबर २0१४ व त्यांनतर २२ व २३ जानेवारी २0१५ या दिवशी केलेली जाहीर वक्तव्ये त्यांच्या पक्षविरोधी कारवायांचे पुरावे आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्याची त्यांनी घोषणा केली होती. तसेच त्यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पणजीतून निवडणूक लढविण्याची घोषणाही केली होती. त्यांना समजावण्याचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना खूप प्रयत्न केला; परंतु त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. अशा पद्धतीची बेशिस्ती पक्षात खपवून घेतली जाणार नाही. त्यांना उत्तर द्यायला वेळ दिला जाणार आहे; परंतु कारवाई निश्चित आहे, असे कवठणकर यांनी सांगितले. मोन्सेरात यांच्यावर शिस्तीचा बडगा उगारून त्यांना पक्षातून हाकलून लावण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असला, तरी बाबूश यांची पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत कोणत्याही कारवाईची शक्यता कवठणकर यांनी फेटाळून लावली. जेनिफर यांनी पक्षविरोधी कामे केल्याचे अद्याप आढळून आलेले नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बाबूशची हकालपट्टी!
By admin | Updated: February 18, 2015 01:59 IST