काश्मीरवरील सिनेमामुळे दिग्दर्शकाचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 08:35 AM2024-03-03T08:35:17+5:302024-03-03T08:35:22+5:30

एका संवेदनशील विषयावर गोव्याचा दिग्दर्शक चांगला चित्रपट काढू शकला, दिग्दर्शकाचे कौशल्य व गुण देशाला कळून आले.

article 370 film director is proud of the film on jammu kashmir | काश्मीरवरील सिनेमामुळे दिग्दर्शकाचा अभिमान

काश्मीरवरील सिनेमामुळे दिग्दर्शकाचा अभिमान

विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

भारतातील एकसंधता आणि निष्ठा हा प्रत्येक भारतीयासाठी कायम महत्त्वाचा कमिटमेन्ट राहिला आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वच राज्यांतील लोक वावरत आहेत, तेच आमचे शक्तिस्थान आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील ३७० कलम मागे घेण्याचा निर्णय घेतला. देशाच्या चांगल्या भविष्याबाबत असलेल्या कमिटमेन्टचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हे कलम मागे घेतले गेले.

जम्मू व काश्मीरला ३७० कलम विशेष दर्जा देत होते. पंतप्रधान मोदी यांनी कलम मागे घेण्याचा जो निर्णय घेतला, तो अतिशय योग्य होता हे नंतर एका न्यायालयीन निवाड्याद्वारेही स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने मोदी सरकारचा तो निर्णय ११ डिसेंबर २०२३ रोजी उचलून (अपहेल्ड) धरला आहे. सर्व राज्ये समान आहेत. पूर्वीच्या जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून लडाखचा भाग हा केंद्रशासित प्रदेश केला गेला. मोदी सरकारचा हा निर्णयही न्यायालयाने उचलून धरला आहे. काश्मीरला आता भारतीय घटनेतील सर्व तरतुदी लागू होत आहेत. 

३७० कलम मागे घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला देशभरातून मोठा पाठिंबा लाभला. गोव्याचे एक युवा दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी 'आर्टिकल ३७०' हा चित्रपट काढला आहे, ही गोष्ट गोव्यासाठी खूप आनंदाची व मोठ्या अभिमानाची आहे. सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा आहे. आदित्य गोव्याच्या पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या वाळपई विधानसभा मतदारसंघातील उसगाव या गावाचे नागरिक आहेत. जांभळे हे मराठी थिएटरशीही संलग्न आहेत आणि त्यांना
२०१६ साली ६४ व्या राष्ट्रीय फिल्म अॅवर्डसमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी (गोल्डन लोट्स) राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या दिग्दर्शकाचे खूप कौतुक करावे लागेल.

लोकांना योग्य ती माहिती मिळण्याबाबत ३७० कलम नावाचा हा चित्रपट उपयुक्त ठरेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हा सिनेमा पाहण्याची संधी गोव्यासह देशातील लोक घेत आहेत. पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणेच या चित्रपटाला देशभरातून खूप प्रसिद्धी, शाबासकी, पाठिंबा व कौतुक मिळत आहे. पणजीत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग नुकतेच करण्यात आले, त्यावेळी दिग्दर्शकाचाही सत्कार करण्यात आला, दीड हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही हा चित्रपट दाखविण्यात आला. 

यापुढे आणखी आठ हजार लोकांना हा सिनेमा दाखवला जाईल. आर्टिकल ३७० हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा अशा प्रकारे जागृती करण्याची विनंती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे. हा सिनेमा काढण्याच्या धैर्याबाबत गुणी दिग्दर्शकाला प्रोत्साहनच द्यायला हवे. कलम ३७० हटविण्याचे महत्त्व नेमके काय आहे हे सिनेमातून दाखविले गेले आहे. या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल या कलाकारांनी काम केले आहे. आर्मी अधिकारी, इंटेलिजन्स एजन्ट्स, राजकारणी व दहशतवादाला पाठिंबा देणारे घटक यांच्या भूमिका विविध कलाकारांनी साकारल्या आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासातील काश्मीरचे स्थान आणि काश्मीरशी निगडीत इतिहास, ३७० कलमाशी निगडीत घटना हे सगळे गोमंतकीयांनाही या चित्रपटातून अधिक चांगल्या प्रकारे कळेल.

चित्रपट हे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. मला खूप आनंद होतोय की एका संवेदनशील विषयावर गोव्याचा दिग्दर्शक चांगला चित्रपट काढू शकला, दिग्दर्शकाचे कौशल्य व गुण देशाला कळून आले. या चित्रपटातून योग्य तो संदेश गेला आहे. सिनेमाच्या निर्मितीमागील सर्व कष्टाळू घटकांना शाबासकी द्यावीच लागेल.

 

Web Title: article 370 film director is proud of the film on jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.