नवी दिल्ली- जगाच्या सागरी परिक्रमेवर निघालेली आयएनएसव्ही तारिणी आज स्टॅनले बंदरात (फॉकलॅन्ड आयलॅन्डस) पोहोचली. संपूर्णपणे महिला अधिकारी असलेली ही पहिलीच सागरी परिक्रमा आहे. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी या नौकेचे नेतृत्व करत असून, या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी.स्वाती, लेफ्टनंट एस.विजया देवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता यांचा समावेश आहे.संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी 10 सप्टेंबर 2017 रोजी गोव्यातून आयएनएसव्ही तारिणीला हिरवा कंदील दाखवला. या नौकेने सुमारे 15 हजार सागरी मैल अंतर कापले असून, 25 सप्टेंबर 2017 रोजी इक्वेटोर, 9 नोव्हेंबर रोजी केप लिवीन आणि 18 जानेवारीला केप हॉर्न पार केले. 41 दिवसांच्या या प्रवासात प्रशांत महासागर ओलांडताना त्यांना खवळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागला.या मोहिमेचे नाव नाविका सागर परिक्रमा असून, महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत आहे. जागतिक मंचावर नारी शक्तीचे दर्शन घडवणे आणि भारतात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हा याचा उद्देश आहे. एप्रिल 2018 मध्ये ही नौका परिक्रमा पूर्ण करुन गोव्यात परतेल असा अंदाज आहे.
स्टॅनले फॉकलँड आयलँडवर सागर परिक्रमेवर असलेल्या तारिणीचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 16:29 IST