ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या शुध्दिपत्रकामुळे गोव्यात नाराजी
By किशोर कुबल | Published: May 13, 2024 02:09 PM2024-05-13T14:09:42+5:302024-05-13T14:09:53+5:30
विरोधी पक्षांकडून केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल
पणजी : ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ४ एप्रिल रोजी काढलेल्या निवेदनाच्या बाबतीत शुध्दिपत्रक जारी केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
गेल्या महिन्यात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे निवेदनात म्हटले होते. परंतु त्यावर आता शुध्दीपत्रक जारी करुन हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले आहे. ४ एप्रिल रोजी काढलेल्या निवेदनात दुरुस्त्याही केल्याचे म्हटले आहे. केंद्राने याबाबत अचानक घुमजाव केल्याची गोमंतकीयांची भावना बनली आहे.
पासपोर्ट जमा केल्यानंतर ओसीआय कार्ड मिळविण्यात गोमंतकीयांना अडचणी येत आहेत. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी असल्यामुळे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचे प्रकार गोव्यात झाले आहेत. याचा अनेक गोमंतकीयांना फटका बसला आहे.
दुटप्पी भूमिका उघड : युरी आलेमांव
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सरकारवर हल्लाबोल करताना केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका उघड झाली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले कि, ‘केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याआधीचे आपले निवेदन मागे घेऊन ओसीआय नोंदणीबाबत गोंधळ निर्माण केला आहे. येत्या ४ रोजी निकालानंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल तेव्हा हा विषय तडीस लावू.’