मडगाव : देशात अराजकता, असहिष्णुता आणि वैरभावाची भावना वाढू लागली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे लोकशाही संकटात सापडल्याचे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी रविवारी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचा भाग म्हणून मडगावात या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबचे खासदार संतोषसिंह चौधरी, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, खासदार शांताराम नाईक, फ्रान्सिस्को सार्दिन, माजी आमदार प्रताप गावस, सुभाष फळदेसाई, मोती देसाई, प्रभाकर तिंबले आदी उपस्थित होते. कॉँग्रेस पक्ष असहिष्णुतेच्या विरोधात येत्या १४ तारखेला मडगावच्या लोहिया मैदानावर जनसभा घेणार असल्याचे फालेरो यांनी जाहीर केले. पंजाबचे खासदार संतोषसिंह चौधरी म्हणाले, जे दलित व गरीब लोक काही कारणामुळे कॉंग्रेस पक्षापासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. देशात सुमारे २० कोटी दलित लोक असून या जनतेचा आवाज कॉंग्रेस पक्ष आहे. कॉँग्रेस पक्षाने दलितांच्या उध्दारासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने घटनेचे शिल्पकार होते. त्यांच्या विचारांचे आचरण होणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्रभाकर तिंबेले यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती करून दिली. बाबासाहेबांनी दलितांच्या उध्दारासाठी प्रयत्न केले. दलितांना आरक्षण देण्यामागे आंबेडकरांची दूरदृष्टी होती, मात्र पन्नास वर्षांनी आरक्षणावर पुन्हा विचार व्हावा, असेही आंबेडकर सांगायचे. आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित एकत्र येतात हा आंबेडकर विचारांचा विजय असल्याचे तिंबले म्हणाले. एम.के. शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आल्तिनो गोमीश यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
भाजपमुळे देशात अराजकता
By admin | Updated: November 9, 2015 01:24 IST