मडगाव : येथील चौगुले उच्च माध्यमिक विद्यालय पुढच्या वर्षापासून बंद होणार, यावर शासनानेच शिक्कामोर्तब केले आहे. हा उच्च माध्यमिक विभाग बंद करण्याची परवानगी चौगुले एज्युकेशनल ट्रस्टला दिल्याची माहिती शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. सरदेसाई यांनी या उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे, चालू शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच शिक्षण खात्याने चौगुलेला उच्च माध्यमिक विभाग बंद करण्याची परवानगी दिली होती. हा विभाग बंद करण्यासाठी चौगुलेने कोणती कारणे दिली होती, असा सरदेसाई यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात, चौगुलेला आपल्या अभ्यासक्रमात बदल घडवून आणायचा असून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठीच हा विभाग बंद करून चौगुले विद्यालयाच्या इमारतीचा वापर रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी करायला हवा, अशी कारणे चौगुलेने हा उच्च माध्यमिक विभाग बंद करण्यासाठी पुढे केली असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हा निर्णय या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेण्यात आला होता, अशी माहिती चौगुलेतील काही शिक्षकांनी ‘लोकमत’ला दिली. चौगुले विद्यालयाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौगुले व्यवस्थापन, शिक्षक संघटना व आणखी एका विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत चौगुलेने अकरावीचे वर्ग यंदा सुरू ठेवावेत व पुढच्या वर्षापासून ते बंद करावेत, असे सुचविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी या वेळी तीन पर्याय समोर ठेवले होते. पहिला पर्याय चौगुले उच्च माध्यमिक विद्यालय सरकारने स्वत:च्या ताब्यात घेणे, दुसरा पर्याय दुसऱ्या कुठल्याही शैक्षणिक संस्थेशी हे उच्च माध्यमिक विद्यालय संलग्न करणे, तर तिसरा पर्याय चौगुलेच्या शिक्षक संघटनेतर्फेच हे विद्यालय चालविणे. शिक्षकांची तशी तयारी असल्यास सरकार सर्व ती मदत करण्यास तयार असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते, असे या शिक्षकांनी सांगितले. (प्रतिनिधी) स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा/५
चौगुले हायर सेकंडरी बंद करण्यास अनुमती
By admin | Updated: July 23, 2014 00:48 IST