मडगाव : कुंकळ्ळी-पांझरखणी येथे मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता कार व दोन मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात कुंकळ्ळी येथील एक ठार, तर पाचजण जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठ्ठाळी येथील रामनाथ चोडणकर आपल्या पत्नीसमवेत मडगावहून कुंकळ्ळीच्या दिशेने स्कूटरवरून जात होते. त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी त्यांच्या मागाहून कुलवाडा-कुंकळ्ळी येथील जीवास देसाई (३५) आपली पत्नी विद्या व पुत्र विप्रांत (६) यांच्यासह कुंकळ्ळीच्या दिशेने जात असताना त्यांच्याही दुचाकीला धडक बसल्याने दोघे पती-पत्नी जखमी झाले, तर पुत्र विप्रांत गंभीर जखमी झाल्याने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जीवास देसाई व त्यांच्या पत्नी विद्या यांना मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रामनाथ चोडणकर यांना हॉस्पिटलमध्ये नेत असता वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी व कारचालक संदेश वेळीप (रा. बाळ्ळी) जखमी झाल्याने त्यांनाही हॉस्पिसिओमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जीवास देसाई हे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
कुंकळ्ळीत अपघात; एक ठार, पाच जखमी
By admin | Updated: August 20, 2014 02:34 IST