लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : एकूण तीन टप्प्यांमध्ये अकरावी व बारावीच्या एकूण ४५ हजार विद्यार्थ्यांना सायबर एज योजनेखाली लॅपटॉप दिले जाणार आहेत. त्यासाठी गोवा इन्फोटेक कॉर्र्पोरेशनने जारी केलेली निविदा उघडण्यात आली आहे. टेक्नोवर्ल्ड कंपनीसह एकूण पंधरा कंपन्यांकडून लॅपटॉपचा पुरवठा केला जाईल, हे आता स्पष्ट झाले आहे.सायबर एज योजनेखाली अलीकडील वर्षांत विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळालेच नाहीत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी बारावीत होते, त्या विद्यार्थ्यांना आणि यंदा जे विद्यार्थी अकरावी व बारावीत पोहचले आहेत, अशा विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जातील. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथम पंधरा हजार लॅपटॉपचे वितरण केले जाईल. त्यानंतर पुन्हा दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी पंधरा हजार लॅपटॉप सरकारचे इन्फोटेक महामंडळ खरेदी करणार आहे. यासाठी निविदा जारी करून ती उघडण्यात आली आहे. कंत्राट मिळविण्यासाठी एकूण एकवीस कंपन्यांनी निविदा भरण्याची तयारी दाखवली होती. त्यापैकी पंधरा कंपन्यांनी शेवटी निविदा भरली. पंधरा कंपन्या पात्र ठरल्या असून टेक्नोवर्ल्ड कंपनीची निविदा ही सर्वात ‘लोवेस्ट’ आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता याबाबतची फाईल मंजुरीसाठी सरकारकडे पाठविली जाणार आहे. एकूण एक तृतीयांश लॅपटॉपचे वितरण टेक्नोवर्ल्डकडून केले जाणार आहे. इतर चौदा कंपन्यांनाही लॅपटॉप वितरणाच्या कामाचा वाटा मिळणार आहे. सुमारे ८५ कोटी रुपयांना सरकार हे लॅपटॉप खरेदी करून विद्यार्थ्यांना मोफत देणार आहे.
४५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप
By admin | Updated: June 15, 2017 02:18 IST