पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३६ राफाएल विमान खरेदीसाठी फ्रान्स सरकारशी केलेला करार हा भारतीय हवाई दलाच्या व पर्यायाने देशाच्या हिताचा आहे. आपण त्या कराराचे स्वागत करतो, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.पर्रीकर म्हणाले, की भारतीय हवाई दलाची केवळ ९७ विमाने उडण्याच्या स्थितीत आहेत. अन्य विमानांची सातत्याने दुरुस्ती करावी लागते. तातडीने हवाई दलाच्या ताफ्यात ३६ विमाने येणे गरजेचे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी फ्रान्सशी केलेला करार हे मोठे सकारात्मक पाऊल आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रयोग हा भविष्यात राबविता येईल.पर्रीकर यांनी सांगितले, की गेली सतरा वर्षे विमान खरेदी झालीच नाही. सतरा वर्षांनंतर भारताने करार केला आहे. एका देशाच्या सरकारने दुसऱ्या देशाच्या सरकारशी केलेला हा करार आहे. ३६ राफाएल जेट विमाने नेमकी कधी हवाई दलाच्या ताफ्यात जमा होतील हे यापुढील काळात स्पष्ट होईल. या विमानांमुळे हवाई दलाला किमान प्राणवायू मिळू शकेल.तत्पूर्वी पर्रीकर म्हणाले, की आंतरराष्ट्रीय राजनैतिक पातळीवर मोदी हे खूप प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आज त्यांच्या शब्दाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वजन प्राप्तझाले आहे. देशासाठी हे खूप गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेच्या विषयाबाबत आपण पंतप्रधानांना दहापैकी दहा गुण देईन. जगातील अनेक देशांमध्ये भारताबाबत व भारतीय संस्कृतीबाबत आत्मियता आहे. गेल्या महिन्यात जपानमध्येही आपण गेलो होतो, तेव्हा तोच अनुभव आला. (खास प्रतिनिधी)
३६ राफाएल विमान खरेदी देशहिताची
By admin | Updated: April 12, 2015 01:11 IST