लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्यटनस्थळ म्हणून जगभरात लौकिक प्राप्त करत असतानाच जुगाराचा शाप लागलेल्या गोव्यातील हॉटेलांमधील आणि मांडवी नदीतील मिळून एकूण दहा कॅसिनोंकडून ३५२.४४ कोटी रुपये येणे आहेत, अशी माहिती मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाला लेखी स्वरूपात देण्यात आली. गेल्या पाच वर्षांच्या काळात परवाना शुल्क व इतर स्वरूपात ही थकबाकी येणे आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी आमदाराच्या एका प्रश्नावर लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, ही देणी वार्षिक आवर्ती शुल्क आणि कोविड महामारीच्या काळातील दायित्वे आहेत. सध्या २४ कॅसिनो परवानाधारक राज्यात असून यात १८ ऑनशोअर आणि ६ ऑफशोअर कॅसिनो आहेत. १८ ऑनशोअर कॅसिनोपैकी नऊ कॅसिनोकडे प्रलंबित थकबाकी आहे, तर त्यापैकी तीन कार्यरत नाहीत. ऑफशोअर कॅसिनोपैकी फक्त एका कॅसिनोकडे प्रलंबित थकबाकी आहे. इतर सहा ऑनशोअर कॅसिनोंचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
सरकारने एप्रिल २०२१ ते १० जुलै २०२५ दरम्यान ऑनशोअर आणि ऑफशोअर कॅसिनोमधून एकूण १,६६१.२७ कोटी महसूल गोळा केला आहे, असेही लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. मेसर्स एम. के. एम. ग्रँड गेमिंग अँड एंटरटेनमेंट कंपनीकडून ८० कोटी रुपये येणे आहेत. १८ टक्के व्याजाने मेसर्स गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ८ कोटी २५ लाख रुपये येणे आहेत. गेल्या १६ जुलै रोजी या कंपनीला सरकारने नोटीसही बजावली आहे.
मेसर्स गोल्डन रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून ७ कोटी २० लाख रुपये येणे आहे. मेसर्स राफ्ल्येस स्क्वेअर डेव्हलपमेंट कंपनीकडून साडेचौदा कोटी रुपये, मेसर्स गोल्डन हॉटेल्स अँड कंपनीकडून १३ कोटी ५० लाख रुपये येणे आहेत. डेल्टा कॉर्प प्लेजर क्रूज कंपनीकडून सव्वा आठ कोटी रुपये येणे आहेत.