पणजी : लोलये-काणकोण येथील २२ लाख चौरस मीटर जमिनीचे इको टुरिझमच्या नावाखाली रूपांतर केले असून सरकारने यापूर्वीच्या दोन्ही प्रादेशिक आराखड्यांमधील तरतुदींना हरताळ फासला आहे, अशी जोरदार टीका अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी विधानसभेत केली. सरदेसाई व अन्य आमदारांनी मिळून वनमंत्री एलिना साल्ढाणा यांना या विषयावरून धारेवर धरले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी सरदेसाई यांनी हा विषय मांडला. त्या वेळी विधानसभेत मंत्री विरुद्ध विरोधक असा जोरदार संघर्ष झाला व सभागृहातील वातावरण तापले. मार्च २०१२ मध्ये निवडणुका झाल्या व भाजप सरकार अधिकारावर येताच तीन दिवसांत त्या वेळी २२ लाख चौ.मी. जमिनीचे रूपांतरण करण्यास आरंभ झाला. लोलयेमधील ही जमीन सेटलमेन्टच्या क्षेत्रात येत नाही. ती आॅर्चड जमीन आहे. दि. ९ मार्चपासून त्या जमिनीचे रूपांतर सुरू झाले. इको टुरिझम नावाचे धोरण अस्तित्वात आहे, याची कल्पनादेखील यापूर्वी सरकारने कुणालाच दिली नाही. या प्रकरणात मंत्री साल्ढाणा गुंतलेल्या नाहीत; पण त्यांना निवडून आणण्यासाठी काही कोटी रुपये आपण खर्च केल्याचे जे कुणी सांगतात, तेच लोलयेमधील प्रकरणी पैसे गोळा करत असतील, असा आरोप सरदेसाई यांनी केला. वन खात्याचे अधिकारी वरिष्ठ मंत्र्यांची दिशाभूल करत आहेत, असेही सरदेसाई म्हणाले. (खास प्रतिनिधी)
लोलयेत २२ लाख चौ.मी. जमीन रूपांतराचा घोटाळा
By admin | Updated: March 27, 2015 01:29 IST