लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोमंतकीयांना १३० कोटी रुपयांना गंडवून विदेशात पळून गेलेला मायरॉन रॉड्रिग्स याच्यासह त्याच्या पाच साथीदारांविरुद्धही फसवणुकीचे गुन्हे नोंदविले आहेत. हे पाच जण मायरॉनच्या कंपनीचे संचालक आहेत. नोलन लॉरेन्स आंताव, ज्योकीम रोझारी पिरीस, विजय दत्तात्रेय जोईल, नवनी पेरेरा, सुशांत घोडगे अशी संचालकांची नावे आहेत. या संशयितांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
संशयितांनी नावेली येथील आयवन सुरेश आल्मेदा यांची ३६.५४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दामदुप्पट परतावा देण्याची आमिष दाखवून मायरॉन आणि त्याची पत्नी दीपाली परब यांनी अनेक लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसे घेतले होते. परतावा राहिला दूरच, परंतु गुंतविलेले पैसेही गेले, अशी परिस्थिती गुंतवणूकदारांची झाली आहे. कारण पैसे घेऊन मायरॉनने पळ काढला. तो विदेशात पळाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत ३७ लोकांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत, परंतु गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाच्या तपासानुसार ५० हून अधिक लोकांना त्याने गंडा घातला आहे, तसेच एकूण १३० कोटींहून अधिक पैसे हडप केले आहेत. आर्थिक गुन्हा विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, आयडिलिक गोवन गेटवेज कंपनीच्या नोलन आंताव, सुशांत घोडगे यांच्यासह चार संचालकांना उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे.
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी पोलिसांकडून विरोधकांचा छळ होत असल्याचा आरोप करून मळकर्णेतील त्यांच्या फार्म हाउसमध्ये पोलिस आले होते, असे जे पत्रकारांना सांगितले, त्याबद्दल विचारले असता, 'एका मोठ्या आर्थिक गुन्ह्याचा तपास पोलिस करीत आहेत,' एवढेच मुख्यमंत्री म्हणाले.
सुशांत हा आमदारांचा स्वीय सचिव
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित सुशांत घोडगे हा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांचा बराच काळ स्वीय सचीव म्हणून होता. त्यामुळेच या प्रकरणाची धग थेट विजय सरदेसाई आणि त्यांचा पक्ष गोवा फॉरवर्डलाही बसणे अपरिहार्य आहे. सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्याचे भांडवल करायला सुरुवात केली आहे.
ब्रोकर म्हणून ओळख
मायरॉन हा स्वतःची ओळख एक स्टॉक मार्केट ब्रोकर अशी लोकांना करून देत होता. त्याची पत्नी दीपाली परब ही स्वतःला गुंतवणूक विषयाची तज्ज्ञ असल्याचेही सांगत होती, म्हणजेच हे फसवणुकीचे कारस्थान दोघांनीही पद्धतशीररीत्या रचले होते, हे स्पष्ट झाले आहे.
मालमत्ताही जप्त
मायरॉनच्या कंपनीचे संचालक असलेले संशयित हे मायरॉनचे लोक होते. मायरॉन, सुनीता आणि दीपाली यांच्या ८ वेगवेगळ्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात ७ फ्लॅट आणि एक व्हिला आहे. सुनीता रॉड्रिग्ज ही मायरॉनची घटस्फोटित पत्नी आहे. पाचपैकी नोलान, विजय जॉडल, नवनिक आणि सुशांत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
३.२५ कोटी हस्तांतरित
तपासात असेही आढळले की, मायरॉनने लोकांनी गुंतविलेल्या रकमेपैकी ३.२५ कोटी रुपये ऑयडलिक गोवन गेटवेज अॅड प्रॉस्पेक्ट रियल्टी फॉर बिझनेस पर्पज नावाच्या कंपनीत हस्तांतरित केले. ही कंपनीही मायरॉनचीच असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीच्या सर्व ५ संचालकांना या प्रकरणात संशयित ठरविण्यात आले आहे.
फातोर्डा ते लंडन संबंध : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे हा राज्यातील सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा असून त्यातील रक्कम ही १०० कोटी नव्हे, तर १३० कोटींवर पोहोचलेली आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. मडगाव रवींद्र भावनात कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, फातोर्डा, गोवा ते लंडनपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती पसरलेली आहे. आर्थिक गुन्हा विभागाकडे हे प्रकरण नोंद झालेले असून त्यांच्याकडून तपास चालू आहे.'
मला बदनाम करण्याचा प्रयत्न : सरदेसाई
दरम्यान, विजय सरदेसाई यांनी सांगितले की, हे प्रकरण जुलै २०२२ मधील, जुने आहे. मी या कारवाईचे स्वागत करतो. याउलट मीच किमान २५ वेळा याचा पाठपुरावा केला. नंतर मुंबई पोलिसांनी काही प्रमाणात यातील वसुली केली. आता माझ्या मित्रांची नावे घेऊन बदनामीचा प्रयत्न चालला आहे. नोकरी कांड प्रकरणातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे.'