पणजी : केंद्रीय अर्र्थ मंत्रालयाकडून गोव्याच्या खनिज मालावरील निर्यात कर ३० टक्क्यांवरून १० टक्के केला जाणार आहे. तशा प्रकारची तरतूद येत्या अर्थसंकल्पात मंत्रालयाकडून केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गोव्याच्या खनिजावरील निर्यात कर काढूनच टाकला जावा म्हणजे तो शून्य करावा, अशी खाण व्यावसायिकांची मागणी आहे. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशभरातील वेगवेगळ््या दर्जाच्या खनिज मालावर वेगवेगळ््या प्रमाणात निर्यात कर लावण्याचा विचार चालवला आहे. राष्ट्रीय स्तरावरून तशा प्रकारची माहिती बाहेर येऊ लागली आहे. निर्यात कराचे प्रमाण कमी करणे हे खाण उद्योग नव्याने उभा राहण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे गोवा सरकारला व केंद्र सरकारलाही वाटते. गोवा सरकारनेही यापूर्वी खनिज निर्यात कर काढून टाकला जावा, अशी मागणी केली होती. देशभरातील ज्या खनिजाची ग्रेड ५० टक्क्यांपर्यंतच आहे, अशा खनिजावरील निर्यात कर केंद्र सरकारने काढून टाकणार आहे. मात्र, ५२ ते ५८ ग्रेडच्या खनिजावर १० टक्के निर्यात कर ठेवला जाणार आहे. खनिज व्यावसायिक हरिष मेलवानी यांच्या मते गोव्याचे खनिज हे ५२ ते ५८ ग्रेडच्या गटात येते व त्यामुळे गोव्याला १० टक्के निर्यात कर लागू होईल; पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती पाहता १० टक्के निर्यात करामुळे गोव्याच्या खाण उद्योगास कोणताही दिलासा मिळणार नाही. आणखी तीन वर्षे तरी खनिज निर्यात परवडणारी नाही. त्यामुळे ३० टक्क्यांवरून कराचे प्रमाण १० टक्के करणेही स्वीकारार्ह नाही. (खास प्रतिनिधी)
गोव्याच्या खनिजावर निर्यात कर १० टक्के
By admin | Updated: February 5, 2015 01:38 IST