लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टी रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी २० फेब्रुवारी रोजी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली. रेगडी, हळदवाही, माडेआमगाव, भाडभिडी, चापलवाडा, विकासपल्ली मक्केपल्ली परिसरातील नागरिकांनी डॉ. होळी यांना निवेदन दिले.
केंद्र व राज्य सरकारने एससी, एसटी, एनटी तसेच ओबीसी समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर घरकुलाचे बांधकाम मंजूर केले असून त्या घरकुलाचे बांधकाम सध्या सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रेती असताना प्रशासकीय उदासीनतेमुळे घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम थांबलेले आहे. शासनाने ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतलेला असतानाही अनेक लाभार्थी वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. डॉ. होळी यांनी ही मागणी केली आहे.
यावेळी उपसरपंच क्षत्रपती दुर्गे, साईनाथ बुरांडे, अजय पुडो, प्रकाश बुरे, संजय पांडे, प्रतीक राठी, उमेश पिटाले, विलास चरडुके, रवींद्र चरडुके, प्रतिमा चरडुके, दशरथ कांदो, वासुदेव भोंवरे, छबीलदास बोलीवार, मनोज चिंचघरे, श्यामराव सोनटक्के, बापूजी मांडवगडे, श्रीनिवास पालावार उपस्थित होते.