गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील ३० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून स्वीप उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात यावा, रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. शुक्रवारी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते युवा संसदेला संबोधित करतांना बोलत होते. कार्यक्रमाला स्वीपच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक तथा रासेयो विद्यापीठ समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले, जिल्हा समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे, डॉ. संजय गोरे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार उपस्थित होते. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिष व प्रलोभनाला बळी न पडता विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा व इतरांनाही जागृत करावे, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकांनी मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. निवडणूक कार्यपद्धती व सुधारणा या विषयावर युवा संसदेचे आयोजन करून युवकांना विचार व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे युवकांनी सक्रीय सहभाग नोंदविला. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत, असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.देशाच्या विकासात युवकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. युवकांनी मतदान जागृती अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन सीईओ संपदा मेहता यांनी केले. युवा संसदेच्या माध्यमातून निवडणूक कार्यपद्धती व सुधारणा याबाबत विचारांचे आदान-प्रदान झाले. युवकांमधील गुण व कमतरता समजण्यास मदत झाली, असे प्रतिपादन डॉ. मोहुर्ले यांनी केले. निवडणूक आयोगासमोरील आव्हाने व सुधारणा याबाबत डॉ. संजय गोरे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अभिरूप संसदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सभापती, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदामंत्री, विरोधी पक्ष नेता, प्रधान सचिव व सनधी नोकर असे विविध पदे महाविद्यालयांकडे प्रातिनिधीक स्वरूपात सोपविण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करून विविध प्रश्नांवर विचार मंथन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन मतदानाचे महत्व पटवून दिले.
गोंडवाना विद्यापीठात भरली युवा संसद
By admin | Updated: September 27, 2014 01:40 IST