गोपाल लाजूरकर ल्ल गडचिरोलीनक्षल दहशतीच्या छायेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रोजगारांचा अभाव आहे. परिणामी अनेक युवक बेरोजगार आहेत. रोजगारासाठी युवकांना बाहेर राज्यात स्थलांतर करावे लागत आहे. जिल्ह्यात कौशल्यावर आधारीत प्रशिक्षणाची उणीव असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील युवक वाट चुकत आहेत. जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण करणे शासनाला अद्यापही शक्य झाले नाही. अनेक युवकांना शासकीय नोकरीची प्रतीक्षा असते. मात्र प्रत्येकालाच शासकीय नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्यावतीने मोफत प्रशिक्षण दिले जाते. मात्र अनेकांना याचा लाभ मिळत नाही. परिणामी जिल्ह्यातील युवक निराशेच्या गर्तेत जात आहेत.अनेकांना आपल्या परिस्थितीशी झुंजावे लागते. तर बहुतांश युवकांकडे सोयी- सुविधा असूनही ते स्वयंरोजगाराकडे वळत नाही. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्यावतीने यापूर्वी आदरतिथ्य, बांधकाम, आॅटोमोबाईल या तीन व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात होते. यामध्ये इतर ९ व्यवसायांची भर घातली आहे. यामध्ये डाटाएन्ट्री आॅपरेटर, टॅली, बँकींग, फायनान्स, बिजनेस प्रोसेसिंग आॅपरेटर, रिटेल मनेजमेंट, सेक्यूरिटी गार्ड, जेम्स आणि ज्वेलरी व हिरापैलूचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्याचबरोबर जेम्स अॅन्ड ज्वेलरीचा व्यवसाय स्वत:ही करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे नवीन ट्रेड पैकी बहुतांश ट्रेडच्या माध्यमातून युवकांना कार्यालयीन रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
रोजगाराअभावी युवा उदासीनतेच्या गर्तेत
By admin | Updated: January 11, 2015 22:52 IST