शहरांमध्ये ८०० रूपये भाव : १४० ते १८० रूपये किलोवर दरगडचिरोली : ७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अरण्य भागात चारोळीचे झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. यंदा चारोळीचे उत्पादन वाढेल, असा अंदाज स्थानिक गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. गडचिरोलीपासून १८ किमी अंतरावर चातगाव जंगल परिसरात मोहफुलाचा सुगंध सध्या दरवळत आहे. मोहफुलांनी लगडलेली झाडे सर्वत्र दिसून येत आहे. पारा ४० अंशाच्या वर जाऊ लागला असून जंगलात रानमेवा जमा करण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. १५ ते १८ फूट उंचीचे चारोळीचे झाड जंगल परिसरात असून या चारोळीचे गुच्छे झाडावर लटकताना दिसू लागले आहे. करवंदा इतकी बारीक असणारी हिरवी फळ परिपक्व होताना आधी तांबूस होते आणि नंतर पूर्ण काळे होऊन वाऱ्याने खाली पडतात. हे फळ वेचने हा या भागातील आदिवासींचा दिनक्रम झाला आहे. काळ्या रंगाचे हे चारोळीचे फळ अतिशय रसाळ आणि गोड असते. पूर्णपणे नैसर्गिक उत्पादन असल्याने कुठेही रासायनिक खत व औषधाचा लवलेसही दिसून येत नाही. आदिवासी ही फळ वेचून ती व्यापाऱ्यांना विकतात. त्याला उन्हात वाळवून विकली जाते. सध्या वेचलेल्या ओल्या चारोळ्या फळाचा दर १४० ते १८० रूपये किलो असल्याची माहिती चातगाव परिसरातील नागरिकांनी दिली. हे फळ वाळल्यावर त्याची साल बाजुला केली जाते. आत एक टणक आवरण असते, हे आवरण फोडल्यानंतर चारोळी निघते. साधारण शहरी लोकांना चारोळी हा सुका मेव्याचा प्रकार आहे आणि तो दुकानातून खरेदी करायचा, इतकेच ठाऊक आहे. त्याव्यतीरिक्त चारोळी हा मराठी साहित्यातील काव्याचा एक प्रकार आहे, अशी एक माहिती आहे.चारोळीचा आजचा बाजारातील भाव ८०० रूपये किलो आहे. चारोळीचे झाड असते, हे अनेकांना नवे असेल. परंतु वर्षानुवर्षे गडचिरोलीच्या वन्यजीवांचा तो एक अविभाज्य भाग आहे. या जंगलात साधारणत: ५ ते ६ टक्के चारोळीचे झाडे असून यंदा चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वास चारोळी जमा करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला आहे. (शहर प्रतिनिधी)
यंदा जिल्ह्यात चारोळीचे उत्पादन वाढणार
By admin | Updated: April 15, 2016 01:52 IST