तुरीचे पीक जोमात : सप्टेंबरच्या पावसाने दिला दिलासा; हलक्या धानाला बसला फटकागडचिरोली : यावर्षात गडचिरोली जिल्ह्यात १०८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीत उत्पादन वाढण्याची आशा बळीराजाला वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस हा सर्वच प्रकारच्या पिकांसाठी दिलासादायक ठरला असून खरीपबरोबर रबी पिकाचेंही उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती आहे.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच मागील पाच वर्षात खरीप क्षेत्र २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर पोहोचले आहे. त्याचबरोबर यंदा २०१६-१७ मध्ये ३० आॅगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानाची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पीक पॅटर्नमध्ये बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहे. सिंचनाची सुविधा नसतानाही गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या भरवशावर शेती करताना शेतकरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या मागे आहे. सद्य:स्थितीत धानपिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबर महिन्यात काही भागात पुरामुळे धानपिकाचे नुकसान झाले. मात्र हा पाऊस बऱ्याच अंशी पिकासाठी दिलासादायक ठरला. कमी मुदतीच्या पिकाला पावसामुळे पोषक वातावरण मिळाले नाही. त्यामुळे हलक्या धानाची नासाडी होऊ शकते. यंदा पाऊस चांगला झाल्याने तलाव, बोड्या, नद्या भरलेल्या असून या वर्षात धान रोवणीची कामे वेळेवर झाल्याने हलके धान परिपक्वहोत आहे. तुरीचे पीकही या वर्षात अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बांधाच्या पाऱ्यावर तुरी लावल्या जातात. त्या सध्या डौलाने उभ्या आहेत. गेल्या व या वर्षात तुरीचे वाढलेले भाव लक्षात घेऊन तुरीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढले. चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
यंदा खरीपाचे उत्पादन वाढणार
By admin | Updated: September 21, 2016 02:33 IST