लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : भर उन्हात कंबरेला पदर खोचून हाताच्या आवळलेल्या गच्च मुठी आभाळाच्या दिशेने उगारत ‘व्यसनमुक्ती जिंदाबाद, दारु खर्रा मुदार्बाद, दारु बंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेंढरी येथील शेकडो महिला दारु व खर्रा विक्रीविरोधात मुक्तिपथच्या साथीने रविवारी रस्त्यावर उतरल्या.या महिलांनी दारुविक्रेत्यांच्या घरावर अहिंसक कृती करण्यासाठी चाल केली. महिलांचा इतका मोठा जत्था पाहून गावातील सर्व दारु विक्रेते आपापल्या घराला कुलूप लावून पसार झाले. महिलांना उप पोलीस स्टेशन पेंढरीची खंबीर साथ मिळाली. पोलिसांच्या एखाद्या तुकडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिस्तीत संचलन करावे अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण गावातून महिलांनी संचलन केले. खर्राविक्रेत्यांनाही खर्राविक्री बंद करण्यासाठी समज दिली. दारु खर्रा बंदीसाठी मुक्तिपथच्या माध्यमातून अहिंसक कृती जोर धरत आहे. पेंढरीच्या मोर्चाचा शेवट जाहीर सभेत झाला. त्यावेळी महिलांनी दारु खर्राबंदी फक्त कागदावर न राहता ती अंमलात आणण्यासाठी दर पंधरा दिवसातून अशा प्रकारे महिलांचे संचलन करण्याचे ठरवले. दारु विक्रेत्यांवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी कारवाई करण्याची विनंती महिलांनी पेंढरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांना केली. त्यांनी पोलीस विभागामार्फत दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास मुक्तिपथ धानोरा तालुक्याचे संघटक सागर गोतपागर यांनी पेंढरीची दारु खर्रा बंदी यशस्वी करण्यासाठी मुक्तिपथ कटिबद्ध असून महिलांनी असाच पुढाकार घेऊन दारू व तंबाखूमुक्तीच्या चळवळीचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी पेंढरी क्षेत्राचे जि. प. सदस्य श्रीनिवास डुम्मलवार, प्रेरक अक्षय पेद्दिवार व रवी अलोने यांनीही मार्गदर्शन केले. या सभेला पेंढरीच्या शेकडो महीला तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
दारू व खर्राविरोधात महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:53 IST
भर उन्हात कंबरेला पदर खोचून हाताच्या आवळलेल्या गच्च मुठी आभाळाच्या दिशेने उगारत ‘व्यसनमुक्ती जिंदाबाद, दारु खर्रा मुदार्बाद, दारु बंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेंढरी येथील शेकडो महिला दारु व खर्रा विक्रीविरोधात मुक्तिपथच्या साथीने रविवारी रस्त्यावर उतरल्या.
दारू व खर्राविरोधात महिलांचा एल्गार
ठळक मुद्देपेंढरीत कार्यक्रम : मुक्तिपथ संघटना व पोलिसांचे सहकार्य;विक्रेत्यांना दिली समज