प्राप्त माहितीनुसार, २० मे २०१९ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कोपर्शी जंगल परिसरात पोलिसांचे सी-६० पथक नक्षल्यांची शोधमोहीम राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या ३० ते ४० नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला; पण लगेच सावध झालेल्या पोलीस पथकाने चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्या ठिकाणी पोलिसांना स्फोटक साहित्य, प्रेशर कूकर, डिटोनेटर, वायर असे साहित्य आढळले. त्या चकमकीच्या कटात सहभागी असणाऱ्या नक्षल नेता बसवराज भुपती, मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह सुशीला मडावी हिच्यावरही हत्यारबंदी कायद्यासह पोलिसांकडील दारूगोळा पळवून नेण्याच्या उद्देशाने गोळीबार करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल भामरागड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे यांनी काही दिवसांत सुशीलास अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने साक्षीदारांचे बयाण व वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षातर्फे ॲड. एन.एम. भांडेकर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.
(बॉक्स)
शिक्षा होणारी पहिली महिला नक्षलवादी
नक्षल चळवळीत मोठ्या संख्येने महिला असल्या तरी कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झालेली सुशीला ही पहिलीच महिला नक्षलवादी ठरली आहे. विशेष म्हणजे न्या. बी.एम. पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा निकाल दिला.