शनिवारी त्यांनी वघाळा गावाला भेट देऊन पक्षी संवर्धन केंद्राचा आढावा घेतला. आरमोरी जवळील वघाळा (जुना) येथे गेल्या अनेक वर्षांपासून हजारो किमीचा प्रवास करून विविध जातीचे देशी, विदेशी स्थलांतरित पक्षी वास्तव्याने येतात. गावातील चिंचेच्या झाडावर हे पक्षी मुक्कामाला असतात. स्थलांतरित पक्ष्याचे प्रजननसुद्धा येथेच होते. वघाळाला प्राप्त झालेले नैसर्गिक सौंदर्य, मुबलक चारा आणि गावाला लागून असलेला नदीकिनारा व गावातील चिंचेची मुबलक झाडे यामुळे पोषक वातावरण असल्याने दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा ओघ या गावाकडे वाढत आहे. पक्ष्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी गावात समिती स्थापन करण्यात आली आहे. पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी गार्डनही उभारण्यात आले आहे. शनिवार, ८ ऑगस्टला गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर व वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी वघाळा (जुना) या गावाला भेट देऊन पक्षी संवर्धन केंद्राची व गार्डनची पाहणी केली. यावेळी वनसंरक्षकानी वघाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन्यजीव पक्षी संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत चर्चा केली. वघाळा येथील वन्य पक्षी संरक्षण व प्रजनन केंद्र व उभारण्यात आलेल्या बगीचाचे वनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांनी परिक्षण करून सदर पक्षी केंद्र व गार्डन पर्यटकांकरिता कमीत कमी तिकीट दर खुले करण्याबाबत चर्चा केली. त्यास उपस्थित गावातील सर्व पदाधिकारी यांनी संमती दिली. यावेळी आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, पळसगावचे क्षेत्रसहायक एम.गाजी शेख, वघाळा समितीचे सचिव तथा वनरक्षक सुखदेव दोनाडकर आदी उपस्थित हाेते.
090821\0528img-20210809-wa0060.jpg
आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना)येथील स्थलांतरित पक्षी संरक्षण व संवर्धन केंद्राला गडचिरोली चे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी भेट देऊन आढावा घेतला यावेळी उपस्थित वनअधिकारी कर्मचारी व गावकरी