गडचिरोली कारागृहातील प्रसंग : प्रवास खर्चासाठी उभी झाली लोकवर्गणीगडचिरोली : गडचिरोली येथे डिसेंबर महिन्यात खुले कारागृह सुरू करण्यात आले. या कारागृहात मागील सहा महिन्यांपासून वास्तव्याला असलेल्या अमरावती येथील एका कैद्याला कुटुंबाच्या भेटीची ओढ लागून होती. मात्र या कामात अनंत तांत्रिक अडचणी असल्याने कुटुंबातील पत्नी व मुलाच्या भेटीचा योग काही जुळून येत नव्हता. कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांनी पुढाकार घेऊन हा भेटीचा योग बुधवारी जुळवून आणला. पत्नी व मुलाच्या भेटीने कारागृहातील कैदी आनंदात भारावून गेला. गडचिरोली येथील खुल्या कारागृहात बाबूखान पठाण हे कैदी मागील सहा महिन्यांपासून वास्तव्याला आहेत. त्यांनी मुलगा व पत्नीच्या भेटीबाबतची इच्छा कारागृह अधीक्षकांकडे बोलून दाखविली होती. बाबूखान पठाण यांची पत्नी शामीम बानो या अमरावती येथे मुलगा टोसीफ खान यांच्या समवेत राहतात. त्या तेथे अनेकांकडे धुणीभांडी करण्याचे काम करतात, अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली. परिस्थिती बेताची असल्याने पतीच्या भेटीची ओढ असूनही अमरावती ते गडचिरोली एसटी प्रवासभाडे खर्च करण्याची त्यांची ऐपत नसल्याने हा योग काही येत नव्हता. अखेरीस गडचिरोली येथे राजेश पतरंगे आणि मेरी विल्सन या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी १५०० रूपयांचे येण्या-जाण्याच्या भाड्याची व्यवस्था करून दिली. त्यामुळे कैदी आपल्या पत्नी व मुलाला भेटू शकला.(जिल्हा प्रतिनिधी)
पत्नीच्या भेटीने बंदीजन सुखावला
By admin | Updated: May 12, 2016 01:31 IST