गडचिरोली : चारित्र्यावर संशय घेऊन क्रूरकर्मा पतीने कुऱ्हाडीने वार करुन आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील अलोणी (विश्रामपूर) येथे घडली. बबीता अशोक वड्डे (२८) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी अशोक मनिराम वड्डे यास शनिवारी अटक केली.सात वर्षांपूर्वी मेंढा (लेखा) येथील मधुकर किरंगे यांची मुलगी बबीता हिचा विवाह अलोणी येथील अशोक वड्डे याच्याशी रीतिरिवाजानुसार झाला होता. मात्र अशोक हा बबीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारझोड करीत असे. शुक्रवारी रात्री अशोकने बबीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी कडाक्याचे भांडण केले आणि कुऱ्हाडीने बबीताच्या मानेवर वार केला. यामुळे ती जागीच गतप्राण झाली. बबीताचे वडील मधुकर किरंगे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आज घटनास्थळी जाऊन अशोक वड्डे यास कलम ३०२ अन्वये अटक केली. बबीताला एक सहा वर्षाचा मुलगा आहे. पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या
By admin | Updated: April 5, 2015 01:43 IST