लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान खरेदी ते भरडाईपर्यंतच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पाच गुन्हे नोंद झाले. यात २१ आरोपींचा समावेश आहे, पण धान खरेदी केंद्रांवरील केवळ दोन ग्रेडर (विपणन अधिकारी) पोलिसांच्या ताब्यात आहेत. धान भरडाई केंद्र मालकासह अधिकारी व खरेदी केंद्राचे संचालक असे तब्बल १९ जण पोलिसांना गुंगारा देत आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये मिळून तब्बल दहा हजार क्विंटलची तफावत आढळली. बारदान्यामध्येही अफरातफर उघडकीस आली होती. दोन्ही वर्षात एकूण ३ कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला होता.
१९ एप्रिल रोजी प्रादेशिक उपव्यवस्थापक एम.एस. बावणे, विपणन अधिकारी सी. डी. कासारकर, एच.व्ही. पेंदाम व संबंधित अध्यक्ष, सचिव , संचालक अशा एकूण १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. विपणन अधिकारी सी. डी. कासारकर, एच.व्ही. पेंदाम या दोघांनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित आरोपी अद्याप मोकळेच आहेत. त्यांना कोण वाचवतयं याची चर्चा आहे.
बडे मासेही सापडेनात
- धान भरडाईमध्ये देखील लाखोंचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात जनता राईस मिलच्या मालकावर २ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
- ३ मे रोजी देसाईगंजातील अजय राईस मिलचे मालक भास्कर किसन डांगे, सोनल पोहा उद्योग मिल, देसाईगंजच्या मालक माया प्रभाकर डांगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला, तर चौथ्या प्रकरणात विद्युत जोडणी नसताना धान भरडाई केल्याचे दाखवून काळ्या बाजारातील तांदूळ पुरवठा केल्याचा ठपका ठेवत कुरुड येथील शारदा स्टिम प्रोडक्ट संस्थेचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावर गुन्हा नोंद झाला. आरोपींमध्ये बडे मासे आहेत. मात्र, यातील एकालाही अटक करण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही.
- दरम्यान, कुरखेडाचे उपअधीक्षक 3 रवींद्र भोसले म्हणाले, या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी कोणीही असो त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.