लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातून नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी आखलेली 'डेडलाईन' पूर्ण झाली असतानाच, आता नक्षल चळवळीचा कणा मानल्या जाणाऱ्या मोस्ट वाँटेड मिसिर बेसराच्या खात्म्यासाठी सुरक्षा दलांनी चक्रव्यूह रचले आहे. गेल्या चार दशकांपासून कुटुंबापासून दूर असलेल्या बेसराला त्याच्या मुलाने व भावाने पत्र लिहून शरणागती पत्करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. तब्बल ५ कोटींचे बक्षीस शिरावर असलेला हा जहाल कमांडर सध्या झारखंडच्या घनदाट सारंडा जंगलात आपल्या ५० सशस्त्र साथीदारांसह दडून बसल्याचा संशय आहे.
१९९० पासून वडिलांचा चेहराही न पाहिलेल्या मुलाने पत्रातून मनातील वेदना व्यक्त करताना, 'तुम्ही नक्षलवादी का बनलात हे मला कदाचित समजणार नाही; मात्र या वयात लढत राहणे योग्य नाही. आता घरी परत या,' अशी आर्त विनंती केली आहे. अनुपस्थितीत सर्व वडिलांच्या शासकीय कागदपत्रांवर काकांचे नाव लावणाऱ्या या मुलाने दक्षिण भारतात आपली ओळख लपवून सामान्य कामगार म्हणून आयुष्य जगत असताना पित्याला ही साद घातली आहे.
कोण आहे हा मिसिर बेसरा ?
१९८० च्या दशकात मिसिर बेसरा याने झारखंडच्या धनबादच्या पी. के. रॉय मेमोरियल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. २००४ मध्ये त्याने ३२ जवानांना संपविले होते. या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. त्यास २००७ मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. मात्र, २००९ मध्ये लखीसराय न्यायालयातून नक्षलवादी हल्ला घडवून तो पसार झाला. नक्षलवाद्यांच्या 'पॉलिट ब्युरो'चा सदस्य आणि 'सेंट्रल मिलिटरी'चा प्रमुख म्हणून तो काम पाहतो.
सारंडा जंगलाला तीन हजार जवानांचा वेढा
झारखंड येथील सारंडा जंगल हे मिसिर बेसरा याचे आश्रयस्थान मानले जाते. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, कोब्रा कमांडोच्या ३ बटालियन्ससह ३ हजार जवानांनी या परिसराला वेढा घातला असून, त्याची आता पूर्णतः कोंडी झाली आहे.
'गणपती'चाही शोध सुरू
माओवादी चळवळीचे दोनच प्रमुख नेते सध्या शिल्लक आहेत. मुप्पला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती व मिसिर बेसरा, एकीकडे मिसिर बेसरासाठी जवानांनी सापळा रचला असताना भूमिगत असलेल्या गणपतीचाही राष्ट्रीय तपास यंत्रणांसह चार राज्यांतील जवानांकडून शोध सुरू आहे. तो फिलिपिन्स किंवा नेपाळमध्ये लपल्याचा अंदाज आहे. दोघेही वयोमानाने थकलेले आहेत. ते जवानांच्या जाळ्यात अडकल्यास माओवादी चळवळीचे शेवटचे नेतृत्व संपुष्टात येणार आहे.
Web Summary : Security forces intensify hunt for Misir Besra, a wanted Naxal leader with a 5 crore bounty. His son and brother appeal for his surrender. 3,000 soldiers surround Saranda forest, his suspected hideout. Search for another Maoist leader, Ganpati, continues.
Web Summary : सुरक्षा बलों ने 5 करोड़ के इनाम वाले वांछित नक्सली नेता मिसिर बेसरा की तलाश तेज कर दी है। उसके बेटे और भाई ने उससे आत्मसमर्पण करने की अपील की है। 3,000 सैनिक सारंडा जंगल को घेर रहे हैं, जहाँ उसके छिपे होने का संदेह है। एक अन्य माओवादी नेता, गणपति की तलाश जारी है।