गडचिराेली : यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला उशिरा पाऊस आला. त्यानंतर ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसला. त्यामुळे रब्बी हंगाम लांबला. गडचिराेली जिल्ह्यातील हलके धानपीक व साेयाबीनचे नुकसान झाले. पाऊस लांबल्याचा परिणाम गहू, ज्वारी व तांदळाच्या दरावर झाला असून २०० ते ३०० रुपयांची दरवाढ झाली आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसेल.
गडचिराेली जिल्ह्यात खरिपातील सर्वाधिक क्षेत्र धानपिकाचे आहे. रब्बी हंगामात शेतकरी गहू, ज्वारी तसेच द्विदल कडधान्य पिकाची लागवड करतात. यामध्ये उडीद, मूग, हरभरा, मसूर, लाखाेळी आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे अल्प उत्पादन घेतले जाते. अहेरी उपविभागातील सिराेंचा तालुक्यात काही शेतकरी ज्वारीचे पीक घेतात. त्यामुळे ज्वारीला जिल्ह्यात मागणीही अल्प आहे. मात्र, गहू, तांदळाचे उत्पादन माेठ्या प्रमाणावर हाेत असले तरी बाजारपेठेत त्यांनाच मागणी आहे.
गहू २,७०० रुपयांवर
गव्हाच्या प्रकारानुसार त्याचे दर ठरविले जातात. सर्वसाधारण गहू २० ते २५ रुपये, मध्यम दर्जाचा गहू २५ ते ३० ते उच्च दर्जाचा गहू ३५ रुपये दर आहे; परंतु, सध्या दाेन हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल मिळणारा गहू दाेन हजार ७०० रुपयांवर पाेहाेचला.
ज्वारी ४,००० रुपयांवर
गडचिराेली जिल्ह्यात ज्वारीचे अल्प उत्पादन व मागणी कमी आहे. तरीसुद्धा ज्वारी तीन हजार ५०० ते तीन हजार ७०० रुपयांपर्यंत मिळत हाेती. आता ती चार हजार ते चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पाेहाेचली आहे.
जुन्या धान्याचे भाव वाढले
- जिल्ह्यात ‘अ’ दर्जाचा जयप्रकाश धान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल.
- सुगंधित माेहरा धान दाेन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल.
- जय श्रीराम धान दाेन हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. हे सर्व दर जुन्या धानाचे आहेत.
परतीच्या पावसाचा रब्बीलाही फटका
- परतीच्या पावसाने रब्बी हंगाम लांबला.
- भुईमूग पिकाची पेरणी शेतकऱ्यांना करता आली नाही.
रब्बी हंगाम लांबल्याने या पिकाचे उत्पादनसुद्धा उशिरा हाेईल. त्यामुळे काही प्रमाणात मागणी व पुरवठ्यावर परिणाम हाेईल. हीच बाब गहू, ज्वारी व तांदळाच्या दरवाढीसाठी कारणीभूत आहे.
- बंटी भाेगावार, व्यावसायिक
महागाई वाढली नाही, असा एकही महिना गेल्या दाेन वर्षांत गेला नाही. महागाईच्या ओझ्याखाली सर्वसामान्य नागरिक दबत आहेत. आणखी किती दबणार?
- पूजा कुळमेथे, गृहिणी
आम्ही भूमिहीन असल्याने तांदूळ खरेदी करताे. आता तांदूळही महागणार असतील तर काय खावे व आर्थिक बजेट कसे सांभाळावे, हा प्रश्न आहे.
- वंदना पाल, गृहिणी