गडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. यावर्षी जिल्ह्यात ६४० हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली. यापैकी जीरायती गव्हाचे हेक्टरी १० क्विंटल तर जीरायती गव्हाचे हेक्टरी सात क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या नजर अंदाज पाहणीत वर्तविण्यात आला आहे. आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी केवळ धान पिकाचे उत्पादन घेत होते. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने धानानंतर इतर कोणतेही पीक लावले जात नव्हते. मात्र शासनाकडून अनुदानावर खोदून देण्यात आलेल्या विहिरी व पंपांचे वाटप यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. काही होतकरू शेतकरी गहू, हरभरा, जवस, तूर, मका या पिकांचे उत्पादन घेत आहेत. आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन होत नाही, अशी चुकीची समजूत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गव्हाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकरी वर्ग आता गहू पिकाची लागवड करू लागला आहे. गव्हाला धानापेक्षाही खर्च कमी मात्र उत्पादन जास्त होत असल्याने शेतकरी पसंती देत आहे.
जिल्ह्यात १० हजार क्विंटल गव्हाचे उत्पादन
By admin | Updated: April 26, 2015 02:01 IST