मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी २४ कोटी २७ लाख रुपये खर्चातून विविध सोयीसुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र क्रीडा विकास प्राधीकरणाने मंजुरी दिली आहे. दरम्यान ज्या जागेत हे क्रीडा संकुल उभारले जात आहे ती वनविभागाची जागा क्रीडा विभागाकडे अद्याप हस्तांतरित झालेली नाही. त्यासंदर्भात वनविभागाने काढलेल्या त्रुटी क्रीडा विभागाने गेल्या महिन्यातच दूर केल्या असल्याने लवकरच जागेचे हस्तांतरण होण्याची आशा बळावली आहे.पोटेगाव मार्गावरील लांझेडा परिसरात असलेल्या ६.९६ हेक्टर जागेवर हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. सध्या त्या जागेवर क्रीडांगण असले तरी ती जागा वनविभागाची आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी ती जागा क्रीडा विभागाला द्यावी असा प्रस्ताव मे २०१६ मध्ये उपवनसंरक्षकांकडे देण्यात आला होता. ११ जानेवारी २०१७ ला वनविभागाने त्या प्रस्तावात त्रुटी काढल्या. त्यात वनहक्क कायदा २००६ नुसार ग्रामसभा (किंवा प्रभाग) समिती, उपविभाग समिती आणि जिल्हास्तरिय समित्यांनी वनविभागाची जागा देण्यासंदर्भात ठराव पारित करून द्यायचे होते. परंतू सदर समित्याच अस्तित्वात नसल्यामुळे आधी समित्यांचे गठन करून त्यांचे ठराव तसेच उर्वरित त्रुटी दूर करणारा प्रस्ताव क्रीडा विभागाने २९ जानेवारीला वनविभागाकडे दिला. हा प्रस्ताव उपवनसंरक्षकांच्या शिफारसीने मुख्य वनसंरक्षक व वन मंत्रालयाकडे जाईल. त्यानंतर जागा हस्तांतरणाबाबत अंतिम निर्णय दिला जाईल.विशेष म्हणजे सदर वनविभागाच्या या जागेचा मोबदला म्हणून १.२९ कोटी रुपये वनविभागाला दिले असून सोबतच वनकायद्यानुसार राजोली येथील १४ हेक्टर महसूल विभागाची जागाही वनविभागाला देण्यात आली. त्याचा सातबारा वनविभागाकडे सोपविण्यात आला आहे.अशा राहणार विविध क्रीडा सुविधाज्या २४ कोटी २७ लाख रुपयांच्या प्रस्तावित कामांना मंजुरी मिळाली आहे त्यात ४०० मीटर रनिंग ट्रॅक, संपूर्ण ६.९६ हेक्टर जागेला कंपाऊंड, ५ बॅडमिंटन कोर्ट असलेला बहुउद्देशिय हॉल, ४० बाय ६० मीटर डोंब असलेले क्रीडांगण, दोन आरसीसी प्रेक्षक गॅलरी, क्रीडा विभागाची कार्यालयीन इमारत, अद्यावत व्यायामशाळा आणि १२० खाटांचे वसतिगृह अशा सोयी राहणार आहेत.सुमारे २४.२७ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असली तरी त्यासाठी निधीची तरतूद स्थानिक स्तरावरच करावी असे क्रीडा प्राधीकरणाने सूचविले आहे. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या ४.८५ कोटी रुपयांमधून सुरूवातीला ४०० मीटर ट्रॅक, कार्यालयीन इमारत आणि वॉल कंपाऊंड ही कामे केली जाणार आहेत. एकूणच कोट्यवधी रूपयातून क्रीडा संकूल उभारले जाणार आहे.८ कोटींपैकी ३.१५ कोटी खर्चक्रीडाविषयक सोयीसुविधांसाठी जिल्हा क्रीडा विभागाकडे २००३ मध्ये ८ कोटी रुपये मिळाले होते. त्यातून ३.१५ कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. त्यात १ कोटी ५५ लाख रुपयांतून कॉम्प्लेक्स परिसरात जलतरण तलाव, बास्केट बॉल क्रीडांगण आणि क्रीडा प्रबोधिनीत ४० खाटांचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. याशिवाय १ कोटी २९ लाख ९९ हजार रुपये जागेसाठी वनविभागाकडे भरण्यात आले आहे. आता ४.८५ कोटी रुपये शिल्लक आहेत.या सुसज्ज क्रीडा संकुलासाठी वनविभागाकडून जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. ती जागा मिळाल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या निधीत बसणाऱ्या कामांच्या निविदा काढल्या जातील. ती कामे मार्गी लावून उर्वरित कामांसाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल.- चंद्रदीप शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी
२४.२७ कोटीतून सुसज्ज क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:45 IST
गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी २४ कोटी २७ लाख रुपये खर्चातून विविध सोयीसुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र क्रीडा विकास प्राधीकरणाने मंजुरी दिली आहे.
२४.२७ कोटीतून सुसज्ज क्रीडा संकुल
ठळक मुद्देप्रस्ताव मंजूर : जागेसंदर्भातील त्रुटी दूर, वनविभागाकडून हस्तांतरण होण्याची प्रतीक्षा