अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमगडचिरोली : समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी, हे शासनाचे धोरण आहे. मात्र विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून ते लाभल्यास गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करु, असे प्रतिप्रादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा आत्राम यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता उपस्थित होत्या. अम्ब्रीशराव आत्राम पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात विविध बँकाच्या माध्यमातून ९० कोटी २५ लक्ष रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शासनातर्फे आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून ५ लाख २७ हजार ३०४ क्विंटल धान मागील हंगामात खरेदी करण्यात आला. हमीभावासोबतच शासनाने धानाला प्रतिक्विंटल २५० रुपये बोनस दिला आहे. शिक्षणासोबत कौशल्यविकास देखील महत्त्वाचा आहे. शासनाने जिल्ह्यातील २ हजार १६२ युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे. १ हजार २३१ युवकांना रोजगार मिळाला असून, या बाबतील जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पर्यटनाच्या दृष्टिने मार्र्कंडेश्वर मंदिर, कालेश्वर मंदिर, आरडा व सोमनूर या स्थळांच्या विकासासाठीही नियोजन करण्यात आले आहे. वडसा-गडचिरोली लोहमागार्साठी पहिला टप्पा म्हणून शासनाने १० कोटी रुपये निधी वितरीत केला आहे. आगामी पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली चालू आहेत, असेही आत्राम म्हणाले. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करू
By admin | Updated: August 17, 2015 01:21 IST