गडचिराेली : शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला असल्याने रेखा व चित्रकलेची आवड असलेल्या व परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परीक्षा रद्द झाली असून, गुण मिळणार नसल्याने जिल्ह्यातील ६०० वर विद्यार्थ्यांच्या रेखाकलेच्या गुणावर आता पाणी फेरले आहे.
शासनाच्या वतीने दरवर्षी चित्रकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दाेन परीक्षा घेतल्या जातात. संकल्पचित्र, स्मरणचित्र, अक्षरलेखन व भुमिती आणि स्थिरचित्र असे चार पेपर या परीक्षेत घेतले जातात. विविध विभागांत नाेकरीत लागताना कलागुणांचा फायदा हाेत असताे. शिवाय इयत्ता अकरावी व त्यापुढील प्रवेशासाठीसुद्धा हे गुण ग्राहृय धरले जातात. जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी या कलागुणांच्या भरवशावर डी.एडला प्रवेश मिळवून शिक्षकांची शासकीय नाेकरीही मिळविली आहे. एकूणच रेखाकलेच्या या परीक्षेला अतिशय महत्त्व आहे. मात्र यावर्षी गुण मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
काेट .....
शासकीय रेखाकला परीक्षा रद्द करून गुण न देण्याचा शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जवळपास सात हजार विद्यार्थ्यांना वाढीव सवलतीचे कलागुण मिळणार नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय रद्द करावा.
- अनिल निकाेडे, कलाशिक्षक, गडचिराेली
काेट .....
मला लहानपणापासून रेखा व चित्रकलेची आवड आहे. यावर्षी मी आठव्या वर्गात असून, एलिमेंटरी परीक्षा देण्याची तयारी केली हाेती. मात्र काेराेनामुळे परीक्षा रद्द झाल्याने उत्साह मावळला. चित्रकलेचा सराव नियमित सुरू असून, आता पुढील वर्षी परीक्षा देऊ.
- विनय रामटेके, विद्यार्थी
काेट ......
काेराेना महामारीमुळे सन २०२०-२१ या वर्षातील चित्र व रेखाकलेची एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यावर्षी झाली नाही. अनेक जिल्ह्यात रेखा व चित्रकलेची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आहेत. मात्र परीक्षा न झाल्याने त्यांचे नुकसान झाले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत हे गुण जाेडल्या जातात. याशिवाय आरेखन व इतर विविध पदांच्या भरतीत हे गुण ग्राह्य धरले जातात. शिवाय महाविद्यालय प्रवेशासाठीही फायदा हाेताे. गडचिराेली जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.
- संजय धात्रक, कलाशिक्षक, गडचिराेली