आरमोरी : तालुक्यातील पळसगाव येथील पळसगाव येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने या गावामध्ये यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पळसगाव हे जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याकडे जनावरेही भरपूर प्रमाणात आहेत. बाहेरचे जलसाठे पूर्णपणे आटल्याने जनावरेही घरीच येऊन पाणी पितात. परिणामी येथील प्रत्येक कुटुंबाला जास्त पाण्याची गरज भासते. पळसगावासाठी पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बांधून दिली आहे. पाणीपुरवठा योजनेची टाकी किन्हाळाजवळील गाढवी नदीच्या तिरावर बांधण्यात आली आहे. या टाकीच्या पाईपलाईन व यंत्रणेत नेहमीच बिघाड होत असल्याने वेळोवेळी पाणीपुरवठा खंडित होतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहेत. नळाचे पाणी बंद पडल्याने नागरिकांना विहीर व हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. गावातील विहिरींचा मागील अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. परिणामी विहिरीच्या पाण्याचीही पातळी खालावत चालली आहे. पाणीपुरवठा योजनेतील बिघाड दुरूस्त करण्याबाबत अनेकवेळा ग्राम पंचायत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
पळसगावात पाणीटंचाईचे सावट
By admin | Updated: May 17, 2015 02:18 IST