कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगावनजीकची घटनाकुरखेडा (गडचिरोली) : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर वाहन उलटल्याने ४१ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरखेडा-कोरची मार्गावर डोंगरगाव फाट्यासमोर बेडगाव घाटाच्या पायथ्याशी घडली. कुरखेडा तालुक्यातील सावरगाव येथील पुरनशहा वट्टी यांच्या मुलाचे लग्न जुळले असून सदर कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसह साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी देवरी तालुक्यातील मोहगाव येथे एमएच ३४ एम ७७५ या मेटॅडोर वाहनाने जात होते. दरम्यान, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने मेटॅडोर बेडगाव घाटाच्या पायथ्याशी उलटला. या मार्गाने वाहनाने येणाऱ्या कोरचीचे नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी यांना सदर अपघात निदर्शनास आला. त्यांनी या अपघाताची माहिती जि.प. सदस्य निरांजनी चंदेल, शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे, पं.स. उपसभापती बबन बुध्दे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. या सर्व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तीन खासगी वाहनात सर्व जखमींना टाकून त्यांना कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघाताची माहिती कळताच पं.स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, रवींद्र गोटेफोडे, चंदू नाकतोडे व अन्य कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताची पुराडा पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)अपघातातील जखमींची संख्या ४० वरअपघातातील जखमींमध्ये महागूबाई वड्डे (५०), लक्ष्मी उसेंडी (५०), शशीकला कुमोटी (४५), रूपेश वट्टी (९), धनवंती वट्टी (४५), शेषराव वट्टी (४०), सुमन श्रीराम वट्टी (४५), माणिक कुमोटी (५०) सर्व रा. सावरगाव हे नऊ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. या सर्वांवर कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित ३२ जखमींमध्ये शालिकराम वड्डे (५५), लता वट्टी (३०), जनाबाई गावडे (३५), बाबुराव गावडे (५०), कांताबाई कुमोटी (४०), दादाजी वट्टी (३५), उर्मिला वट्टी (३०), उमाकांत वट्टी (३०), शेवंता वट्टी (५५), कौशल्या नैताम (४५), मुक्ताबाई गावडे (५०), यशाबाई वट्टी (७२), सोनजाम वट्टी (५०), लता हलामी (४५), सिंधू गावडे (३०), शिला वनखी वट्टी (४०), राजेश्वर नैताम (४०), गोमाजी मडावी (५५), दिनकर वट्टी (३०) सर्व रा. सावरगाव, शामशाही होळी (६०), मनोहर गावडे (५५), सुमन मनिराम वट्टी (५५), विश्वनाथ चने (६०) सर्व रा. येंगलखेडा, पे्रमिला दुगा (४५), भाविका उसेंडी (२०), सुमन उसेंडी (५०) रा. कसारी व बळीराम कोडाप (४७) रा. धनेगाव यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर कुरखेडाच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
वऱ्हाडाचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 01:22 IST