देसाईगंज : २५ मे रोजी रविवारी दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला. या नक्षत्राचा पाऊस पिकांना लाभदायक ठरणारा नसला तरी उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांची सुटका होऊ शकते. सध्या शेतकरी व शेतजमीनीलाही मृग नक्षत्राची प्रतीक्षा लागली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरूवातही झाली आहे. शेतकरी खते, बियाणे व शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या मशागतीबरोबरच घराचे छत व धाबे, इमारतीचे टेरेस आदींची स्वच्छता, दुरूस्ती करण्याच्या कामात वेग आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने यंदा पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी असेल असे वर्तविले आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या बाबतीत साशंक आहेत. मृग नक्षत्र हे सहसा ७ जून रोजी सुरू होते. परंतु यावर्षी मृग नक्षत्र ८ जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होत आहे. या नक्षत्राला हत्ती हे वाहन असल्यामुळे नक्षत्रात भरपूर पाऊस येण्याची शक्यता आहे. पंचांगकर्त्यांच्या मते एकंदरीत पर्जन्य नक्षत्र वाहनावरून पाहता बराच अनियमित पाऊस पडेल, काही ठिकाणी ते जास्तही पडेल. रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या चरणात आकाश आभ्रच्छादित राहून उन्हाळा वाढेल, असे सांगण्यात येत आहे. वर्षाकाळातील ११ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्र पावसाचे असतात. सहसा ५ नक्षत्र जरी बरसले तरी शेती चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते. रोहिणी नक्षत्र ७ जूनपर्यंत राहणार आहे. ८ जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पाऊस पडेपर्यंंत उन्हाच्या प्रखरतेचा सामना करावा लागणार आहे. पावसाळा जवळ आला असला तरी उन्हाचा पारा कमी होतांना दिसत नाही. १५ ते २0 दिवस शिल्लक असतांना शेतीच्या मशागतीने वेग घेतला आहे. परंपरागत शेती करताना यांत्रिकीकरणाची जोड दिली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
बळीराजाला मृग नक्षत्राची प्रतीक्षा
By admin | Updated: May 31, 2014 23:29 IST