जुने झाडही कोसळले : शाळा, आरोग्य उपकेंद्रावरचे टिनपत्रे उडालेआलापल्ली : मुलचेरा व अहेरी तालुक्याच्या टोकावर असलेल्या वेलगूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर, किष्टापूर टोला, बोटला चेक टोला, वेलगूर या गावांना १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. यामध्ये अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. तर अनेक झाडे उन्मळून पडली. बोटला चेक येथील सोनवणे यांच्या घरावर चिंचेचे झाड पडले. यामध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर झाड धोकादायक असल्याने ते कापण्यात यावे, याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सोनवणे कुटुंबावर संकट कोसळले आहे. शंकरपूर येथील नागो भिमा निकुरे यांच्या घराचे छत वादळामुळे उडून गेले. बोटला चेक येथील राजे धर्मराव हायस्कूलचेही छत पडले. शंकरपूर येथील प्राथमिक उपकेंद्रावर व परिसरातील विद्युत खांबांवर झाड कोसळले. त्यामुळे या परिसराचा विद्युत पुरवठा १७ एप्रिलच्या रात्री बंद होता. झालेल्या नुकसानीबाबतची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. येथील नागरिकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असल्याने या सर्व नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी वेलगूर, शंकरपूर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
वेलगूर परिसराला वादळाचा तडाखा
By admin | Updated: April 20, 2016 01:38 IST