दत्ता मेघे यांचे प्रतिपादन : विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा जिल्हास्तरीय सदस्य मेळावागडचिरोली : विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे कार्य २००५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून सुरू केले. यापुढेही परिषदेच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्न राहणार असून गडचिरोलीसह विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री दत्ता मेघे यांनी केले. विदर्भ प्रदेश विकास परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील कात्रटवार सभागृहात आयोजित विकास परिषदेच्या जिल्हास्तरीय सदस्य मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, डॉ. राजू मिश्रा, मेहमुदभाई अंसारी, लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, हर्षलता येलमुले, संगीता रेवतकर, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झाला पाहिजे. अन्याय अत्याचाराविरोधात महिलांनी संघर्ष करावा, असेही दत्ता मेघे यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, सुरेश पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय कोतपल्लीवार, संचालन पंडीतराव पुडके यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
विदर्भासह गडचिरोली जिल्हा विकासासाठी प्रयत्न करणार
By admin | Updated: January 18, 2016 01:30 IST