शंतनू गोयल यांचे आवाहन : आरमोरी येथील शिक्षकांच्या प्रशिक्षणाला दिली भेटआरमोरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत आरमोरी तालुक्यातील भाषा व गणित विषयाच्या शिक्षकांनी प्रशिक्षणातून ज्ञानरचना अध्यापन पद्धत व इतर कौशल्य आत्मसात केले. या प्रशिक्षणाचा सर्व प्रशिक्षित शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी उपयोग करावा, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी केले.महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेद्वारा गटसाधन केंद्र आरमोरी येथे आयोजित शिक्षकांच्या प्रशिक्षणाला शेवटच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी ते बोेलत होते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी भाषा व गणित विषयाच्या प्रशिक्षण मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेद्वारा आॅनलाईन लिंक देण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून केवळ आरमोरी तालुक्यातील शिक्षकांनी या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी आॅनलाईन नोंदणी केली. त्यानुसार १३ ते १५ जून या कालावधीत भाषा व गणित विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी भेटीदरम्यान प्रशिक्षणाची रूपरेषा तसेच शैक्षणिक साहित्याची माहिती मार्गदर्शक मनीषा चन्नावार, अरूणा कवठे यांच्याकडून जाणून घेतली. प्रशिक्षणातून काय साध्य केले, अशी थेट विचारणा गोयल यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना यावेळी केली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, आरमोरीचे बीडीओ सज्जनपवार, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा आदी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सुनंदा गिरपुंजे, अविनाश झिलपे, अमोल पडोळे, गुलाब मने, अरूणा बागेसर, योगेश वाढई आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षणाचा उपयोग करा
By admin | Updated: June 16, 2016 02:03 IST