अहेरी : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेकडून अहेरी आगारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आगाराचे अध्यक्ष मेघराज बागसरे व सचिव अब्दुल वाहब यासीनी यांनी केले. या आंदोलनात रसीद शेख, दिलीप कोरेत, गोपाल समय, लक्ष्मण ढेबरे, शामराव गेडाम, संजय कांबळे, बब्बू शेख, अर्जुन कांबळे, अरूण रामटेके, शेख युनूस, व्ही. टी. आनबोरे, भगवान वाघमारे आदीसह कामगार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध प्रवासी वाहतुकीवर कायम बंदी घालण्यात यावी, मॅक्सीकॅब सारख्या लहान वाहनांना दिलेली प्रवासी वाहतुकीची परवानगी रद्द करणे, राज्य शासनाकडे एसटीचे थकीत असलेले १३६० कोटी रूपये परत करणे, ज्या मार्गावर एसटीला नुकसान होते त्या मार्गावरील तोट्याची रक्कम शासनाकडून भरून देणे, महाराष्ट्र शासनाकडून लावण्यात आलेला १७.५० टक्के प्रवासी कर रद्द करून इतर राज्याप्रमाणे ५.५ टक्के उत्पन्न कर लावणे, पथकरातून एसटीला दरवर्षी १२५ कोटीचे नुकसान होत आहे. एसटीही सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याने पथकरातून एसटीला सवलत देण्यात यावी, डिझेलवरील कर कमी करण्यात यावा, सेवानिवृत्त कामगाराच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात याव्या. याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अहेरी तालुका काँगे्रेस कमेटीने जाहीर पाठींबा दर्शविला होता. आंदोलनाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेहबूब अली यांनी भेट देऊन मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)
अहेरीत एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: July 18, 2014 00:05 IST