लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी, नागरिक, शेतकरी, दुकानदार यांची चांगलीच धांदल उडाली. देसाईगंज, कुरखेडा, आष्टी, आरमाेरी, कुरुड, अहेरी, आलापल्ली, एटापल्ली भागातही पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तापमानात घट हाेऊन थंडी वाटायला लागली. वादळामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडाली. धानाेरा : दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. दर गुरुवारी धानाेरा येथे आठवडी बाजार भरतो. ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. खरेदी केलेले धान गाेदामात ठेवले असल्याने ते सुरक्षित आहे. मात्र शेतकऱ्यांचे धान परिसरात ताडपत्री झाकून ठेवले हाेते. या धानाला पाणी लागून खराब हाेण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी ताडपत्री झाकली नव्हती. अशा शेतकऱ्यांची वेळेवर धावपळ झाली.
अवकाळी पावसाने काेरचीच्या मंडईत उडाली धांदलकोरची : येथे गुरुवारी देवमंडईचे आयाेजन करण्यात आले हाेते. मात्र, दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चांगलीच धांदल उडाली. पावसामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. मागील वर्षी कोरोनाचे सावट येण्याआधीच कोरचीची मंडई जोरदार भरली होती. यावर्षीसुद्धा सकाळपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली हाेती. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली व मंडईत तारांबळ उडण्यास सुरुवात झाली. जाेराच्या वादळामुळे काही दुकानदारांचे सामान उडून गेले, तर नागरिक ताडपत्रीच्या दुकानाचा सहारा घेत स्वत:ला पावसापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत हाेते. वादळ-वाऱ्यामुळे दुकानांची ताडपत्री उडून कपडे ओले झाले. मिठाईच्या दुकानांत धूळ शिरून मिठाई खराब झाली. हिरवा भाजीपाला खराब झाला. मनेरी दुकानांचे सामान इकडे तिकडे झाले. रात्री नाटकांचे आयाेजन करण्यात आले हाेते. मात्र, पावसामुळे ते हाेण्याबाबत अनिश्चितता कायम हाेती.
वीज पडून म्हैस जागीच ठारकोरची येथूून ११ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या गहानेगाटा येथील एका शेतकऱ्याच्या गाेठ्यावर वीज पडल्याने एक म्हैस जागीच ठार झाली. ही घटना गुरूवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. ही म्हैस रमेश मानकुर बोगा याच्या मालकीची आहे. बाेगा यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी हाेत आहे.